Join us

Reliance Industries Share : ₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:42 AM

Reliance Industries Share Price: सोमवारी सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला, तर मंगळवारी त्यात किरकोळ घसरण झाली. या घसरणीत अनेक बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यात रिलायन्सलाही मोठा फटका बसला.

Reliance Industries Share Price: गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. सोमवारी सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला, तर मंगळवारी त्यात किरकोळ घसरण झाली. या घसरणीत अनेक बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी घसरण झाली. या घसरणीमुळे कंपनीचं मार्केट कॅप जवळपास ८० हजार कोटी रुपयांनी घटलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सोमवारी ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बीएसईवर हा शेअर ३.३५ टक्क्यांनी घसरून २,९५६.७० रुपयांवर आला. दरम्यान, मंगळवारीही त्यात घसरण सुरूच होती. मंगळवारी त्यात ०.८९ टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीनंतर या कंपनीचा शेअर २,९२७ रुपयांवर आला.

कंपनीचं मार्केट कॅप घटलं

दोन दिवसांच्या घसरणीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप सुमारे ८० हजार कोटी रुपयांवर पोहोचलं. सोमवारी ३ टक्क्यांहून अधिक घसरणीमुळे कंपनीचं मार्केट कॅप जवळपास ६७ हजार कोटी रुपयांनी घसरलं. या घसरणीमुळे कंपनीचं मार्केट कॅप १९.९८ लाख कोटी रुपयांवर आलं.तर, मंगळवारी त्यात सुमारे १२ हजार कोटी रुपयांची घसरण झाली. त्यामुळे या दोन दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप ७९ हजार कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप १९.८२ लाख कोटी रुपये आहे.

महिन्यात तीन टक्क्यांहून अधिक घसरण

अलीकडच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये खूप चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.४८ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, ६ महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सहा महिन्यांत १.४३ टक्क्यांची घट झाली. मात्र, दीर्घ काळासाठी रिलायन्सच्या या शेअरचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. ५ वर्षात जवळपास १२६ टक्के परतावा दिला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी