नवी दिल्ली: जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील भारतीय नाव म्हणजे मुकेश अंबानी (Mukesh Ambani). अंबानी यांची रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रिज आताच्या घडीला सर्वाधिक मार्केट व्हॅल्यू असलेली कंपनी आहे. रिलायन्स कंपनीचे जाळे अनेक क्षेत्रात पसरलेले आहे. कोरोना संकटाच्या काळातही रिलायन्स कंपनीने काही क्षेत्रात दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यातच आता रियालन्स कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून दर दिवशी सव्वा कोटी रुपयांचे दान केल्याची माहिती समोर आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध सामाजिक कामांना भरभरून दान दिले आहे. यासाठी रिलायन्सने आपल्या सीएसआर फंडातून तब्बल ११८४.९३ कोटी रुपये खर्च केले आहेत. रिलायन्स कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या एका अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनीने कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन पुरवठा, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात हा निधी खर्च केला आहे.
कोरोना संकटाच्या आणीबाणीच्या प्रसंगात मोठा खर्च केला
गेल्या आर्थिक वर्षात सामाजिक जबाबदारीत पुढाकार, आरोग्य आणि समाजासाठी कल्याणकारी योजना कंपनीच्या अजेंड्यावर होते. मागील आर्थिक वर्षात कंपनीने फक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर देशात कोरोना संकटात ओढावलेल्या आणीबाणीच्या प्रसंगात मोठा खर्च केला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने सीएसआर निधी खर्च केला जातो. रिलायन्सने गरजूंच्या मदतीसाठी सीएसआर उपक्रमांसाठी एकूण ११८४.९३ कोटींचा खर्च केला आहे.
दरम्यान, सन २०२१ च्या सुरुवातीला अनेक अपेक्षा होत्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे संकट उभे राहिले होते. या संकटाने देशासह जगावरही परिणाम झाला. रिलायन्सने देशातील नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिलायन्सने केलेले काम हे फक्त सीएसआर म्हणून नव्हते. तर, लोकांचे आयुष्य, त्यांची स्वप्ने आणि भविष्य वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले.