Join us

Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:10 AM

Reliance Jio IPO : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकर लॉन्च होऊ शकतो. त्यांच्या या कंपनीत मेटा, गुगल सारख्या कंपन्यांचीही भागीदारी आहे. पाहूया कोणती आहे कंपनी आणि किती असेल शेअरची किंमत.

Reliance Jio IPO : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लवकरच लिस्ट होण्याची शक्यता आहे. दिग्गज उद्योजक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या या कंपनीनं २०१६ मध्ये देशातील टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. रिलायन्स जिओ इन्फोकॉममध्ये जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचा हिस्सा आहे. यामध्ये मार्क झुकेरबर्ग यांची कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स, गुगल आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. २०२० मध्ये अंबानी यांनी रिलायन्स जिओचा एक तृतीयांश हिस्सा १३ परदेशी कंपन्यांना विकला होता. हा हिस्सा ५७ ते ६४ अब्ज डॉलर्सना विकण्यात आला. पण त्याच्या लिस्टिंगसाठी व्हॅल्यूएशन १०० अब्ज डॉलर्स असू शकते. 

हिंदू बिझनेसलाइननं दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स समूहाचे (Reliance Group) वरिष्ठ अधिकारी जिओला सूचीबद्ध (Reliance Jio isting) करण्याच्या बाजूने आहेत. याचे कारण म्हणजे आता हा व्यवसाय बऱ्यापैकी मॅच्युअरही झाला आहे. त्यासाठी चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. पण त्याची लिस्टिंग १०० अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्यूएशनवर असू शकते. आयपीओसाठी शेअरची किंमत १,२०० रुपये असू शकते. रिलायन्स जिओचे मूल्य ८२ ते ९४ अब्ज डॉलर असल्याचं बहुतांश विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण मोबाइल टॅरिफ वाढल्याने त्यात वाढ होऊ शकते. निवडणुकीनंतर देशातील मोबाइलच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असं मानलं जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रतिक्रिया विचारण्यासाठी पाठवलेल्या ईमेलला उत्तर दिलेलं नाही. 

कोणाचा किती हिस्सा? 

रिलायन्स जिओच्या आयपीओमुळे खासगी इक्विटी कंपन्या आणि इतर गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. वर्ष २०२० मध्ये या कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओमध्ये २० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यामुळे या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) मोठा वाटा असू शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये रिलायन्स जिओचा महसूल १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता आणि निव्वळ नफा २०,६०७ कोटी रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्सच्या एकूण महसुलात त्याचा वाटा १० टक्के आणि नफ्यातील वाटा २९ टक्के होता. २०२० मध्ये अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समधील एक तृतीयांश हिस्सा १३ परदेशी कंपन्यांना विकला होता. यात मेटाचा ९.९ टक्के आणि गुगलचा ७.७३ टक्के हिस्सा आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार