Join us

Jio ची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी! चिनी कंपनीला मागे टाकलं, बनली जगातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 2:16 PM

Mukesh Ambani Reliance Jio : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओनं एक नवा विक्रम रचला आहे.

Mukesh Ambani Reliance Jio :  दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओनं (Reliance Jio) डेटा वापराच्या बाबतीत नवा विक्रम रचला आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, रिलायन्स जिओनं डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत चायना मोबाईलला मागे टाकलंय. रिलायन्स जिओ डेटा ट्रॅफिकमध्ये जगातील नंबर वन कंपनी बनली आहे. गेल्या तिमाहीत एकूण डेटा ट्रॅफिक ४०.९ एक्साबाइट्स नोंदवलं गेलं. त्याचवेळी डेटा ट्रॅफिकमध्ये आतापर्यंत जगातील नंबर वन कंपनी असलेली चायना मोबाईल दुसऱ्या क्रमांकावर घसरली. 

या तिमाहीत त्यांच्या नेटवर्कवरील डेटाचा वापर ४० एक्झाबाइट्सपेक्षा कमी राहिला. डेटा वापराच्या बाबतीत चीनची आणखी एक कंपनी चायना टेलिकॉम तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारताची एअरटेल चौथ्या स्थानावर आहे. जगभरातील टेलिकॉम कंपन्यांचा डेटा ट्रॅफिक आणि कंझ्युमर बेसवर लक्ष ठेवणाऱ्या TAfficient नं आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली. 

डेटा वापरात वाढ 

5G सेवा सुरू केल्यानंतर, रिलायन्स जिओचा डेटा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ३५.२ टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे रिलायन्स जिओचं ट्रू 5G नेटवर्क आणि जिओ एअर फायबरचा (Jio Air Fiber) विस्तार. जिओ नेटवर्क रिलायन्स जिओच्या तिमाही निकालांनुसार, Jio True 5G नेटवर्कमध्ये १० कोटी ८० लाख ग्राहक जोडले गेले आहेत आणि जिओच्या एकूण डेटा ट्रॅफिकचा सुमारे २८ टक्के हिस्सा आता 5G नेटवर्कवरून येत आहे. दुसरीकडे, जिओ एअर फायबरनेही देशभरातील ५,९०० शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. 

पूर्वी डेटा वापर इतका होता 

कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जिओ नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर २८.८ जीबीपर्यंत वाढला आहे, जो तीन वर्षांपूर्वी फक्त १३.३ जीबी होता. २०१८ मध्ये भारतातील एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिक एका तिमाहीत केवळ ४.५ एक्साबाइट्स होता.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीचीन