Join us  

महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:38 PM

एकीकडे रिटेल चेनद्वारे या पदार्थांची विक्री करण्याचा विचार सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारनं भारत ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळींच्या किंमतीत वाढ केली आहे.

महागाईला आळा घालण्यासाठी रिटेल चेनद्वारे इंडिया ब्रँडचं पीठ, तांदूळ आणि डाळींची विक्री करण्याचा विचार सरकार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासाठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलसोबत चर्चा करत आहे. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात किंमती स्थिर ठेवण्यासाठी रिलायन्सच्या जिओमार्ट, अॅमेझॉन आणि बिगबास्केट सह ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भारतीय ब्रँडेड उत्पादनांसाठी यापूर्वीही अल्पमुदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु पहिल्यांदाच सरकार खासगी किरकोळ विक्रेत्यासोबत आपल्या बफर स्टॉकमधील खाद्यपदार्थ सवलतीच्या दरात विकण्यासाठी दीर्घकालीन करार करण्याचा विचार करत आहे.

रिटेल चेन डीमार्ट आणि इतर किराणा किरकोळ विक्रेत्यांशीही अशाच व्यवस्थेसाठी बोलणी सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. दरम्यान, यावर रिलायन्सनं आणि डीमार्टची मूळ कंपनी एव्हेन्यू सुपरमार्टनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भारत ब्रँडअंतर्गत सरकार लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करते.

२०२३ मध्ये सुरुवात

महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारनं २०२३ मध्ये भारत पीठ, भारत डाळ आणि भारत तांदूळ योजना लाँच केली होती. ही योजना विशेषत: दारिद्र्य रेषेखालील नसलेल्यांसाठी आहे. त्यामुळे ते पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्यासाठी पात्र नाहीत. नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया आणि नाफेडतर्फे सध्या केंद्रीय भंडारासह त्यांच्या आउटलेट्स आणि मोबाइल स्टोअर्सद्वारे भारतीय ब्रँडेड उत्पादनांची विक्री केली जाते.

किंमतीही वाढल्या

दरम्यान, सरकारनं भारत ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळींच्या किंमतीत वाढ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० किलो भारत पीठ आता ३०० रुपयांना तर १० किलो भारत तांदूळ ३४० रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे चणाडाळीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १० किलो पिठाची किंमत २७५ रुपये होती, तर १० किलो तांदूळ २९० रुपयांना मिळत होता. त्याचप्रमाणे भारत ब्रँडची एक किलो चणाडाळ ६० रुपयांना मिळत होती. ही किंमत आता ७० रुपये करण्यात आली आहे.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीमहागाई