Ambani Vs Adani: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स इंड्रस्टिजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीवरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. कधी अंबानी अदानी यांच्यापेक्षा दोन पायऱ्या वर चढताना दिसतात. तर कधी अदानी अंबानी यांना मागे टाकून पुढे निघून जातात. यातच आता मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, यासाठी तब्बल १ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलचा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या आहेत. कंपनीची कर्ज घेण्याची मर्यादा ५० हजार कोटींवरून १ लाख कोटींपर्यंत वाढवता येण्यासाठी रिलायन्स रिटेलने आपल्या भागधारकांची परवानगी मागितली आहे. रिलायन्स रिटेल भविष्यातील व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी महत्त्वाकांक्षी योजना तयार करत आहे. रिलायन्स रिटेलने यावर्षी ३१ मार्चपर्यंत ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी
रिलायन्स रिटेलच्या भागधारकांनी कंपनीला कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्याची परवानगी दिली तर रिलायन्स रिटेलला ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची संधी मिळेल. रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी असून १५,१९६ स्टोअर्स किराणा माल आणि इतर विविध उत्पादने विकली जातात. या क्षेत्रात कंपनीची थेट स्पर्धा गौतम अदानींशी होईल. अलीकडेच अदानी अंबानींना मागे टाकून देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
दरम्यान, रिलायन्स रिटेल देशातील व्यवसाय वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. छोट्या शहरांमध्ये नवीन स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. रिलायन्स रिटेलला पुढील एका वर्षात २ हजारांपेक्षा जास्त फिजिकल स्टोअर्स उघडायची आहेत. रिलायन्स रिटेलने २०२१-२२ मध्ये स्टोअर्सची संख्या वाढवण्यासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.