नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळवणारे आशियामधील ते एकमात्र आहेत.ब्लूमबर्ग बिलिओनेअर इंडेक्सतर्फे जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अंबानी यांनी सहावे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये अॅमेझॉनचे जेफ बेझोस (संपत्ती १८४ अब्ज डॉलर) हे पहिल्या स्थानावर असून बिल गेट्स ( संपत्ती ११५ अब्ज डॉलर) दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. तिसरा क्रमांक बर्नार्ड अॅर्नाेल्ट यांचा असून त्यांच्याकडील संपत्ती ९४.५ अब्ज डॉलरची आहे. मार्क झुकेरबर्ग आणि स्टेल बार्मर हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर असून त्यांच्याकडील संपत्ती अनुक्रमे ९०.८ आणि ७४.६ अब्ज डॉलरची आहे. सहाव्या स्थानावर आलेले मुकेश अंबानी यांच्याकडे ७४.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.मुकेश अंबानी यांनी गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत सहावे स्थान पटकावले आहे. वॉरन बफेट या इन्व्हेस्टमेंट गुरूंपेक्षा अंबानी हे दोन स्थाने वरती आहेत. आता ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी पहिले पाच स्थानांच्या अगदी निकट पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या १० व्यक्तींमध्ये अंबानी यांचा अपवाद वगळता अन्य एकही आशियाई नागरिक नाही.अशी वाढली अंबानी यांची मालमत्ता- अंबानी यांच्या मालमत्तेमध्ये गतवर्षात २१७ दशलक्ष डॉलरची वाढ होऊन ती ७२.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मुकेश अंबानी यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या कंपनीचा डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या जिओ कंपनीमध्ये १२ जागतिक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळविली असून, त्याद्वारे १.१८ लाख कोटी रुपये जीओला मिळाले आहेत.याशिवाय रिलायन्सने नुकताच आपल्या भागधारकांसाठी राईट्सइश्यू आणला असून, त्याद्वारेही रिलायन्सच्या भांडवलामध्ये वाढझाली. याचा फायदाही अंबानी यांना आपल्या संपत्तीमध्ये वाढकरताना झाला.रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतेच आपले बाजार भांडवलमूल्य १२लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक केले आहे. गेल्या २ महिन्यांपासून रिलायन्सचे शेअर्स बाजारामध्ये नवनवीन उच्चांक गाठत असल्यानेकंपनीची आणि तिचे प्रवर्तक असलेल्या अंबानी यांची मालमत्ता वाढत असलेली दिसून आली आहे.
मुकेश अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत; पहिल्या दहातील एकमेव भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 2:06 AM