mukesh ambani vs elon musk : देशात मोबाईल नेटवर्क क्षेत्रात जिओच्या एन्ट्रीने अनेकांचे धाबे दणाणले होते. वर्षभरातच डझनभर नेटवर्क कंपन्यांनी देशातून गाशा गुंडाळला. आता टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी देशात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे जिओसह अनेक कंपन्यांना तगडा स्पर्धक मिळणार आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या मार्गात उभे राहिले आहेत. त्यांनी ट्रायला सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम देण्यापूर्वी इलॉन मस्कच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉनच्या क्विपरच्या प्रवेशाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे. रिलायन्सचे म्हणणे आहे की स्पेक्ट्रम वाटप लिलावाद्वारे केले जावे जेणेकरुन भारतीय कंपन्यांनाही समान वाटा मिळेल.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना लिहिले पत्र
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दूरसंचार नियामक ट्राय आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अंबानींनी स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रशासकीय पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. स्पेक्ट्रम वाटप लिलावाद्वारे करावे यावर एअरटेलचे सुनील मित्तल आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांचे एकमत आहे. दुसरीकडे, स्टारलिंकचे सीईओ इलॉन मस्क यांनी लिलावाला विरोध केला आहे. सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रममध्ये वैयक्तिक किंवा घरगुती वापरकर्त्यांसाठी सध्या कोणतीही तरतूद नाही.
काय आहे रिलायन्सची भूमिका?
लिलाव प्रक्रियेमुळे देशांतर्गत दूरसंचार कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल, असे रिलायन्सचे म्हणणे आहे. हे उद्योगाच्या हिताचे असेल. सध्या अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. स्पेक्ट्रम वाटपात प्राधान्य दिले जात असतानाही, कोणत्याही देशांतर्गत कंपनीला स्वतःचे जिओ-सॅटेलाईट स्टेशन उभारण्याची संधी मिळणार नाही.
सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने केले जाईल आणि लिलाव होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, ते मोफत मिळणार नसल्याचेही सरकारने म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांचा दर्जा वाढला असताना ही घटना समोर आली आहे. त्यांच्याकडे सरकारी कार्यक्षमतेच्या विभागाची म्हणजेच DODGE ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इलॉन मस्क यांनी निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार समर्थन केले.