भारतात डेटा सेंटर विकसित करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिजिटल रियल्टीमध्ये (Brookfield Infrastructure and Digital Realty) गुंतवणूकीची घोषणा केली आहे. ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिजिटल रियल्टीमध्ये भारतातील कंपन्यांमधील रिलायन्स ३३.३३ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. प्रस्तावित गुंतवणूक ३७८ कोटी रुपयांची आहे. गरजेनुसार यानंतर ती ६२२ कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. हा व्यवहार पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
डिजिटल रियल्टी ट्रस्ट आणि ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील संयुक्त उपक्रम भारतातील डिजिटल सेवा कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकसित करतो. हा संयुक्त उपक्रम हाय क्वालिटी, हायली कनेक्टेड आणि मागणीनुसार स्केलेबल डेटा सेंटर तयार करतो. या करारानंतर रिलायन्स या संयुक्त उपक्रमात समान भागीदार बनेल. नवीन संयुक्त उपक्रमाचं नाव 'डिजिटल कनेक्शन: ए ब्रुकफील्ड, जिओ आणि डिजिटल रियल्टी कंपनी' असं केलं जाईल.
संयुक्त उपक्रम सध्या चेन्नई आणि मुंबईतील प्रमुख ठिकाणी डेटा सेंटर विकसित करत आहे. चेन्नईमध्ये १०० मेगा वॅट परिसरात संयुक्त उपक्रमाचा पहिला २० मेगाव्हॅट आणि ग्रीनफील्ड डेटा सेंटर (एमएए१०) २०२३ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संयुक्त उपक्रमानं नुकताच ४० मेगाव्हॅट डेटा सेंटर बनवण्यासाठी मुंबईत २.१५ एकर जमिन घेतल्याची घोषणा केली होती.