Join us

मुकेश अंबानी लवकरच ठरविणार आपला उत्तराधिकारी, स्वत:च केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 5:54 AM

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आशियातील व जगातील मोजक्या उद्योगपतींमध्ये त्यांची आणि बड्या उद्योग समूहांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची गणना केली जाते.

मुंबई : आपला उत्तराधिकारी  लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे विधान रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केले असून, रिलायन्स समूहाचा कारभार तरुण पिढीकडे सोपविण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. एवढेच नव्हे, तर ही प्रक्रिया आपणास वेगाने पूर्ण करायची आहे, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आशियातील व जगातील मोजक्या उद्योगपतींमध्ये त्यांची आणि बड्या उद्योग समूहांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची गणना केली जाते. आपला उत्तराधिकारी ठरविण्याची घोषणा करताना अंबानी यांनी आपला वारस आणि वारसा हक्क ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचेही स्पष्ट केले. आपले वडील धिरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातच त्यांनी नेतृत्व बदलाची सुरुवात झाली असल्याचे दाखवून दिले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही येत्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वात भक्कम व प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक असेल, असे सांगताना मुकेश अंबानी यांनी भविष्यात रिलायन्स समूह रिटेल, दूरसंचार तसेच हरित ऊर्जा या तीन व्यवसायांमध्ये लक्ष पुरविणार आहे, हेही नमूद केले. सध्या रिफायनरीमध्येही रिलायन्सचा मोठा वाटा आहे. 

अंबानी म्हणाले की, आपल्या समूहामध्ये नवे नेतृत्व तयार करणे गरजेचे आहे. अशक्य वाटणारी उद्दिष्टे व मोठी स्वप्ने पाहणाऱ्या या प्रतिभावान व सक्षम पिढीकडे आपण रिलायन्सची सूत्रे साेपवू आणि त्यांना मार्गदर्शन करू,  ते आपल्याहून चांगली कामगिरी करून दाखवतील, अशी मला खात्री आहे. तसे घडेल, तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे. 

आकाश, अनंत की ईशा?मुकेश अंबानी यांनी ते सूत्रे कोणाकडे सोपविणार, याचा अजिबात उल्लेख केला नाही. त्यांना आकाश,अनंत व ईशा अशी तीन मुले आहेत. त्यापैकी ईशाचा विवाह आनंद पिरामल यांच्याशी झाला असून, आकाश यांचा विवाह श्लोक मेहता यांच्याशी झाला आहे. अनंत (वय २६) हे सर्वात लहान व अविवाहित आहेत. आकाश व अनंत या दोघांना अनेकांनी आयपीएल सामन्यांच्या वेळी पाहिले आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स