Join us

Reliance Retail: ईशा अंबानी होऊ शकतात रिलायन्स रिटेलच्या अध्यक्ष? लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 1:46 PM

Reliance Industries Retail Unit : ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी ( Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओची ( Reliance Jio) जबाबदारी आपला मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे  ( Akash Ambani) सोपवली आहे. आता ते आपल्या रिटेल व्यवसायाची जबाबदारी मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे ( Isha Ambani) सोपवण्याच्या तयारीत आहेत.

ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रिलायन्स समूहाचा रिटेल व्यवसाय ईशा अंबानी यांच्याकडे सोपवण्याच्या तयारीवरून स्पष्ट संकेत मिळत आहे की, मुकेश अंबानी यांनी आपल्या सर्व व्यवसायांच्या उत्तराधिकाराच्या योजनांची ब्लू प्रिंट तयार केली आहे.

ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलच्या अध्यक्ष बनवण्याची घोषणा येत्या एक ते दोन दिवसांत होऊ शकते, असे म्हटले जात आहे. सध्या ते रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये  (Reliance Retail Ventures Ltd.) संचालक आहेत आणि रिटेल व्यवसायाच्या विस्ताराची जबाबदारी ईशा अंबानी यांच्यावर आहे.

ईशा अंबानी 30 वर्षांच्या असून त्यांनी येल विद्यापीठातून (Yale University) उच्च शिक्षण घेतले आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हे दोघे जुळी भावंडे आहेत. मंगळवारी आकाश अंबानी यांना रिलायन्स समूहाच्या दूरसंचार व्यवसायाची जबाबदारी देण्यात आली. 27 जून 2022 रोजी आकाश अंबानी यांची देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे (Reliance Jio) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान,  27 जून रोजी रिलायन्स जिओच्या बोर्डाची बैठक झाली आणि या बैठकीत आकाश अंबानी यांना कंपनीचे अध्यक्ष बनवण्यास बोर्डाने मान्यता दिली. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 217 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :ईशा अंबानीमुकेश अंबानीरिलायन्सआकाश अंबानीरिलायन्स जिओ