जागतिक इंधन टंचाईने गेल्या वर्षी गॅसच्या किंमतींना उच्चांकी पातळीवर नेऊन ठेवले आहे. यामुळे रिलायन्सची चांदी होणार असून साऱ्या जगाच्या नजरा मुकेश अंबानींकडे लागल्या आहेत. केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय दरांच्या आधारावर गॅसची किंमत ठरविते. ऑफशोर गॅस विक्रीसाठीच्या मुल्यात वाढ झाल्यास बंगालच्या खाडीमध्ये कृष्णा-गोदावरी फील्ड्समध्ये नैसर्गिक गॅसचे उत्पादन काढणाऱ्या रिलायन्सला मोठा फायदा होणार आहे.
जगभरात नैसर्गिक गॅसची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे रिलायन्स गॅसचे व्हाईस प्रेसिडंट संजय रॉय यांचे म्हणणे आहे की, भारत ऑफशोर गॅस विक्रीची किंमत ६० टक्क्यांनी वाढवून १० डॉलर प्रती दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट करेल, अशी आह्माला अपेक्षा आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वात आम्ही या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहोत. गेल्या तिमाहीत आम्ही ३६ टक्क्यांनी जास्तीचे गॅस उत्पादन केले आहे.
रॉय यांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे भागीदार बीपी पीएलसी आता दररोज 18 दशलक्ष घनमीटर गॅसचे उत्पादन करत आहे आणि 2023 मध्ये हे उत्पादन प्रतिदिन 30 दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तेल आणि वायू उत्पादनातून रिलायन्सचा महसूल डिसेंबर तिमाहीत रु. 25.6 अब्ज ($343 दशलक्ष) वर पोहोचला.
जगातील टंचाईवर मुकेश अंबानींनी उत्पादन वाढविले तर काहीसा दिलासा मिळणार आहे. शिवाय भारत सरकार आणि रिलायन्सला देखील याचा फायदा होणार आहे.