२०२३ हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आहे. या वर्षभरामध्ये जगभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. गेल्या वर्षीपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध, ऑक्टोबर महिन्यात भडकलेले इस्राइल आणि हमास युद्ध तसेच आर्थिक मंदीचं सावट या काळात काही अब्जाधीशांनी दणकून कमाई केली. तर काही उद्योगपतींना नुकसानीचा सामना करावा लागला. वर्ष संपत असताना जगातील अब्जाधीशांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई केली आहे. कमाईबाबत मस्क सर्वांचे बॉस ठरले आहेत. गतवर्षभरात एक्स (आधीचा ट्विटर) वरून मस्क हे खूप वादात सापडले होते. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या यादीवर लक्ष टाकलं तर २०२३ मध्ये एलन मस्क यांनी ९७.८ दशकक्ष डॉलरची कमाई केली आहे. ही कमाई रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार सन २०२३ मध्ये एलन मस्क यांनी ९७.८ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. त्यांची एकूण कमाई २३६ अब्ज डॉलरवप पोहोचली आहे. या अपार मालमत्तेसह एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक बनले आहेत. एलन मस्क एकापाठोपाठ एक आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. टेस्ला ही त्यांची ड्रिम कंपनी आहेत. मस्क या कंपनीला भारतात आणण्याची तयारी केली आहे. त्यासाठी भारत सरकारसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.
भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक असलेल्या मुकेश अंबानी यांनी २०२३ मध्ये ९.७ अब्ज डॉलर एवढी कमाई केली आहे. या कमाईसह मुकेश अंबानी यांची एकूण नेटवर्थ ९६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अंबानींनंतर जर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत ते म्हणजे अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी. या वर्षाच्या सुरुवातील हिंडेनबर्गने दिलेल्या धक्क्यानंतरही अदानी यांनी पुनरागमन करण्यात यश मिळवलं आहे. या वर्षभरात अदानी यांनी ३६.३ अब्ज डॉलरची संपत्ती गमावली आहे. त्यांची एकूण संपत्ती ही ८४.३ अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत ते १५ व्या क्रमांकावर आहे. अदानी यांची जेवढी एकूण संपत्ती आहे तेवढी संपत्ती मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी वर्षभरात केली आहे.