मुंबई - आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सातत्याने त्यांच्या व्यवसायात वाढ करत आहेत. रिलायन्स रिटेल एकामागोमाग एक डील करून या क्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण करतंय. आता अंबानी यांच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका बड्या कंपनीचे नाव जोडले आहे. चॉकलेट बनवणारी कंपनी Lotus Chocolate या कंपनीचे ५१ टक्के शेअर्स रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लि.ने खरेदी केले आहेत.
७४ कोटींमध्ये झाला व्यवहाररिपोर्टनुसार, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सने लोटस चॉकलेट कंपनीमधील मोठी भागीदारी ७४ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. या करारात RCPL ने लोटस चॉकलेटच्या नॉन कम्यूलेटिव रिडीमेबल प्रेफरेंस शेअरसाठी २५ कोटी रुपये अदा करत कंपनीवर नियंत्रण मिळवले आहे. रिलायन्सकडून अधिकृतरित्या २४ मे पासून कंपनीची कमान हाती घेण्यात आली आहे. ओपन ऑफरतंर्गत शेअर्सचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले आहे.
२९ डिसेंबर २०२२ रोजी झाला होता करारRCPL ने बाजार नियामक SEBI च्या टेकओव्हर नियमांनुसार लोटसच्या इक्विटी शेअर भांडवलाच्या अतिरिक्त २६ टक्के संपादन करण्याची सार्वजनिक घोषणा केली. RRVL ही मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे आणि RIL समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. रिलायन्स आणि लोटस यांच्यातील हा करार गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाला होता.
१९८८ मध्ये झाली लोटसची सुरुवातप्रकाश पी पै, अनंत पी पै आणि लोटस प्रमोटर ग्रुपच्या इतर सदस्यांनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड यांच्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. डिसेंबरमध्ये डील सुरू असताना त्यासाठी प्रति शेअर ११३ रुपये किंमतही निश्चित करण्यात आली असून या दराने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे चॉकलेट कंपनी लोटसची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. ते कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते
कंपनी अधिग्रहणाच्या बातमीनं शेअर्समध्ये उसळीमुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबतचा करार पूर्ण झाल्याच्या बातमीने चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी व्यवहाराच्या शेवटी लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे शेअर १.८२ टक्क्यांनी वाढून १४८ रुपयांवर बंद झाले. याआधी, जेव्हा ही डील जाहीर करण्यात आली होती, तेव्हा जेव्हा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसली आणि सलग १६ दिवस त्याच्या शेअरमध्ये अपर सर्किट दिसले. लोटस चॉकलेट कंपनीने मार्च २०२२ मध्ये संपलेल्या वर्षात ६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीने ८७ कोटी रुपयांची विक्री केली आहे.