नोव्हेंबरमध्ये एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढविल्या त्यानंतर 1 डिसेंबरपासून रिलायन्स जिओने देखील दरवाढ केली. ही दरवाढ केल्यानंतर व्होडाफोन एकमेव अशी कंपनी आहे जिने 179 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनवर एसएमएस सेवा ऑफर केलेली नाही. कंपनीच्या या पावलामुळे या प्लॅन्सच्या ग्राहकांना एसएमएस पाठविता येत नाहीय.
व्होडाफोन आयडियाचे हे पाऊल ग्राहकांना आपल्या नेटवर्कवर रोखून धरण्यासाठी असू शकते. कंपनी सबस्क्रायबर्स मार्केट शेअर वाढण्यासोबतच नवीन ग्राहकांना आपल्या नेटवर्कला जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
काय होतोय परिणाम....
जर कोणी व्होडाफोन आयडियाचा 179 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन घेतला असेल तर तो आऊटगोईंग एसएमएस पाठवू शकत नाही. यामुळे तो पोर्ट करण्यासाठी देखील एसएमएस पाठवू शकणार नाहीय. हीच गोष्ट मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला पसंत पडलेली नाही.
रिलायन्स जिओने देखील प्लॅन्सचे दर वाढविलेले असले तरी सध्या त्यांचेच प्लॅन सर्वात स्वस्त आहेत. यामुळे व्होडाफोन आयडिया, एअरटेलचे ग्राहक जिओकडे जाण्याची शक्यता आहे. या ग्राहकांना रोखण्यासाठी व्होडाफोनने ही खेळी खेळल्याचे जिओला वाटत आहे. यामुळे जिओला नवीन सबस्क्रायबर्स जोडण्यास समस्या येण्याची शक्यता आहे.
ट्रायकडे केली तक्रार
व्होडाफोनच्या या निर्णयावर जिओने ट्रायकडे तक्रार केली आहे. कमी किंमतीच्या प्लॅनचे ग्राहक जिओ किंवा एअरटेलमध्ये पोर्ट करू शकत नाहीत, असे जिओने म्हटले आहे. सध्यातरी ट्रायकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त जिओच नाही तर टेलिकॉम वॉचडॉगनेदेखील ट्रायला व्होडाफोनचे हे पाऊल योग्य नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांना स्वस्त एसएमएस बंडलची गरज आहे, कारण त्यांच्याकडे नेहमी जेव्हा वाटेल तेव्हा पोर्टआऊट करण्याचा पर्याय असायला हवा.