Join us  

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अरब राष्ट्रांना दिला जबर धक्का, केली अशी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 1:38 PM

Reliance News: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने रशिकाकडून मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईलची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एकूण क्रूड ऑईलच्या आयातीमधील पाचवा भाग हा रशियाकडून आलेला होता.

मुंबई - युक्रेनविरुद्धच्या युद्धानंतर रशियाने त्याच्याकडील क्रूड ऑईल जागतिक दरापेक्षा कमी दराने विकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय रिफायनिंग कंपन्यांनी तेलाची आयात करण्यासाठी रशियाकडे आपली पावलं वळवली होती. मात्र रशियाकडून क्रूड ऑईल मावण्यासाठी होणाऱ्या अधिकच्या खर्चामुळे भारतीय रिफायनरींना काही विशेष फायदा झाला नाही. मात्र रशियाचं क्रूड ऑईलने पहिल्यांदा भारताच्या एकूण आयातीच्या ५ टक्के वाटा मिळवला होता. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने रशिकाकडून मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईलची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मे महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एकूण क्रूड ऑईलच्या आयातीमधील पाचवा भाग हा रशियाकडून आलेला होता. व्यापाराच्या आकड्यांनुसार युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने जागतिक दरांपेक्षा कमी दरामध्ये क्रूड ऑईलची निर्यात करण्यास सुरुवात केली होती. आकडेवारीनुसार रिलायन्सने मे महिन्यामध्ये दररोज सुमारे १.४ दशलक्ष बॅरल तेलाची आयात केली. हे प्रमाण एप्रिल महिन्याच्या तुलनेत  ९.१ टक्क्यांनी अधिक आहे.

रिलायन्सने आखाती देशांमधून आपली आयात कमी केली आहे. ही आयात ६७ टक्क्यांवरून घटून एप्रिल महिन्यात ६१ टक्क्यांवर आली आहे. दरम्यान, रशियाच्या नेतृत्वाखालील सीआयएस देशांकडून क्रूड ऑईलची खरेदी केली आहे. हे प्रमाण भारताच्या एकूण क्रूड ऑईलच्या आयातीच्या १६ टक्के आहे.

क्रूड ऑईलची आयात करणार भारत हा जगातील तिसरा मोठा देश आहे. युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून सवलतीच्या दरातील क्रूड ऑईल खरेदी केले होते. मात्र हा सौदा भारताला खर्चिक ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे रशियाकडून क्रूड ऑईलच्या आयातीसाठी शिपिंग आणि इन्शोरन्स कॉस्टच्या रूपात मोठ्या प्रमाणावर रकमेचा भरणा करावा लागतो. युक्रेन युद्धामुळे शिपिंग आणि इन्शोरन्स कॉस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीखनिज तेल