Join us

अवघ्या दोन दिवसांत २९,००० कोटींनी वाढली मुकेश अंबानींची संपत्ती; जाणून घ्या कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:11 PM

Mukesh Ambani's Income: गेल्या काही दिवसात भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये अजून वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये गेल्या काही दिवसात अजून वाढ झाली आहे. रिलायन्स समूहाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीने अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. या सभेनंतर दोन दिवसातच संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

अंबानी यांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या अ‍राम्कोला रिलायन्स अ‍ॅाईल अँड केमिकल्स या कंपनीतील २० टक्के हिस्सा विकला जाईल. या हिश्श्याचं उद्यम मूल्य (इंटरप्राईज व्हॅल्यू) ७५अब्ज डॉलर आहे. कंपनी 18 महिन्यात पूर्णतः कर्जमुक्त होईल, पुढील महिन्यात जिओ फायबर लाँच केलं जाईल, यादेखील घोषणा त्यांनी सर्वसाधारण सभेत केल्या. याचा अनुकूल परिणाम शेअर बाजारात झाला आणि कंपनीच्या समभागांचं मूल्य 11 टक्क्यांनी वाढलं. त्यामुळे आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 28 हजार 684 कोटी रुपयांनी वाढ झाली.

येत्या काळात क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचेही रिलायन्सने जाहीर केले. कंपनी देशभरात डेटा सेंटर सुरू करणार असून त्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी करारही केला आहे. या डेटा सेंटरला मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅझ्यूर या क्लाउड सेवेचे सहाय्य मिळेल. १ जानेवारी २०२० पासून ही सेवा सुरू होणार असून, त्यानंतर युझर्सना आपला डेटा रिलायन्सच्या या क्लाउड मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवता येणार आहे. ही सेवा स्टार्टअप्सना मोफत देणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सजिओ