सिंगापूर : जागतिक बँकिंग नेटवर्कद्वारे दरवर्षी सुमारे २ ते ३ लाख कोटी डॉलरचे अवैध व्यवहार होतात; तसेच यातील ९६ टक्के व्यवहारांचा पत्ताही लागत नाही, असा गौप्यस्फोट जागतिक तपास संस्था इंटरपोलने केला आहे.
इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गन स्टॉक यांनी सांगितले की, अवैध व्यवहारांचा ज्यांना फटका बसतो त्यापैकी केवळ २ ते ३ टक्के लोकांनाच पैसे परत मिळतात.
जुर्गन स्टॉक यांनी सांगितले की, बँकिंग नेटवर्कच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी इंटरपोल सातत्याने काम करीत आहे.
एआयमुळे स्थिती आणखी बिघडली
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) बँकिंग नेटवर्कमधील अवैध व्यवहारविषयक स्थिती आणखी वाईट झाली आहे. तपास संस्थांसमोरील आव्हाने वाढली आहेत. बँकिंग संघटनांकडून देवघेवीवर नजर ठेवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली जात आहे.