Join us

छप्पर फाड के! वर्षभरात १ लाखाचे २५ लाख; 'या' शेअरनं अनेकांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 8:53 AM

एका वर्षात मिळाला २,३३२.२ टक्के इतका परतावा; गुंतवणूकदारांची चांदी

मुंबई: गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजारात भरभराट पाहायला मिळाली. बीएसईचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स १० टक्क्यांनी वर गेला. या कालावधीत एका मल्टिबॅगर स्टॉकमध्ये २,३३२.२ टक्के वाढ पाहायला मिळाली. ब्राईटकॉम कॉर्पच्या शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल २,३३२.२ टक्के इतका परतावा दिला. 

ब्राईटकॉम कॉर्प कंपनीच्या एका शेअरची किंमत १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ६.१७ रुपये होती. सोमवारी याच शेअरची किंमत १५०.१० रुपये झाली. याचा अर्थ वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये कोणी १ लाख गुंतवले असतील, तर आता त्याची किंमत २४.३२ लाख रुपये झाली आहे. ब्राईटकॉम कॉर्प मिडकॅप प्रकारात मोडतो. काल बीएसईवर उलाढाल थांबली तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत १५७.७० रुपये होती. सकाळी व्यवहारांना सुरुवात होताच शेअरची किंमत घसरून ती १४९.८५ रुपयांवर पोहोचली. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली. बीएसईवप कंपनीचं बाजारमूल्य १५,६०८ कोटी रुपये आहे. 

२०२२ मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत २२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीनं ५२ आठवड्यांमधील सर्वोच्च स्तर गाठला होता. त्यावेळी शेअरची किंमत २०४.८० रुपयांपर्यंत पोहोचला होता. ५ मे २०२१ रोजी शेअरचा दर ५.८२ रुपये होता. ५ मे २०२१ ते २४ डिसेंबर २०२१ या ७ महिन्यांच्या कालावधीत शेअरची किंमत ३,४१८ टक्क्यांनी वाढली.

ब्राईटकॉम समूह जगभरात ऍड टेक, न्यू मीडियावर काम करते. डिजिटल इकोसिस्टिममध्ये कंपनी विशेष सक्रीय आहे. एअरटेल, ब्रिटिश एअरवेज, कोकाकोला, ह्युंडाई मोटर्स या कंपन्या ब्राईटकॉमच्या मुख्य ग्राहक आहेत.

टॅग्स :शेअर बाजार