Join us

छप्परफाड कमाई! वर्षभरात ५ लाखांचे १६ लाख; 'या' शेअरनं गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 9:23 AM

वर्षभरात शेअरची किंमत २२५ टक्क्यांनी वाढली; कोरोना संकटात दमदार कमाई

मुंबई: दोन वर्षांपासून अर्थकारणावर कोरोनाची गडद छाया पाहायला मिळत आहे. शेअर बाजार अनेकदा कोलमडला. कोरोना रुग्णांची संख्या, त्यामुळे लागू झालेले निर्बंध यांचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर दिसला. मात्र या कालावधीतही काही शेअर्सनी घोडदौड केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली.

ग्रेनाईट किचन सिंक तयार करणाऱ्या Acrysil Limited च्या शेअरनं बाजारात उत्तम कामगिरी केली. गेल्या वर्षभरात शेअरची किंमत २२५ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे अवघ्या वर्षभरात गुंतवणूकदारांच्या ५ लाखाचे १६ लाख झाले आहेत. वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत २३० रुपये होती. आता ती ७५० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. 

गेल्या काही दिवसांत शेअरच्या किमतीत पडझड पाहायला मिळाली. मात्र दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा शेअर लाभदायी ठरला. गेल्या १० वर्षांत या शेअरची किमत ५ हजार टक्क्यांनी वाढली आहे. या शेअरची किंमत आणखी वाढू शकेल असा अंदाज यस सिक्युरिटीजनं वर्तवला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही या शेअरनं महसुलाच्या आघाडीवर उत्तम कामगिरी केली आहे. माल वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतरही कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन २१ टक्के आहे. 

यस सिक्युरिटीजनं दिलेल्या माहितीनुसार Acrysil Limited आपल्या क्षमतेत वाढ करत आहे. कंपनी सध्या ८.४० लाख क्वार्ट्झ सिंक तयार करते. हा आकडा १२ लाखांवर नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. स्टेनलेस स्टिल सिंकचं उत्पादन दुपटीनं वाढवण्याच्या योजनेवर कंपनीकडून काम सुरू आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर चांगला परतावा देऊ शकतात. 

टॅग्स :शेअर बाजार