CNG, PNG Price Hike: एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असताना परवडणाऱ्या सीएनजी (CNG) आणि घरगुती गॅस पाईपलाईनचे (PNG) दरही वाढणार आहेत. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपये प्रतिकिलो आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात प्रति युनिट १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासूनच दरवाढ लागू होणार आहे. धक्कादायक बाब अशी की मुंबई मेट्रोपोलियन परिसरात गेल्या वर्षभरात म्हणजेच फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सीएनजीच्या दरात एकूण मिळून तब्बल प्रतिकिलोमागे १८ रुपयांची दरवाढ झाली आहे.
मुंबई आणि नजिकच्या परिसरात ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बसेस सीएनजीवर चालतात. त्यामुळे आता टॅक्सी तसंच ऑटोरिक्षा चालकांनीही प्रवासी भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. टॅक्सीच्या प्रवासी भाड्यात किमान ५ रुपयांची तर रिक्षाच्या प्रवासी भाड्यात किमान २ रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. असं झाल्यास सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे.
"राज्यातील सर्वसामान्य नागरिक आता सीएनजीतील दरवाढ आता अजिबात सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना याप्रकरणात लक्ष देण्याची मागणी करणारं पत्रं लिहीलं आहे", असं मुंबई ऑटोरिक्षा चालक संघटनेचे नेते शशांक राव यांनी सांगितलं.
दरवाढीनंतर मुंबईत असा असेल सीएनजी व पीएनजीचा नवा दरमुंबईत आणि लगतच्या परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून दरवाढ लागू झाल्यानंतर सीएनजीचा दर प्रतिकिलो ६६ रुपये, तर घरगुती पाईपलाईन गॅसचा दर युनिटसाठी ३९.५० रुपये इतका असणार आहे.