देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आपलं घर असावं, असं इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र इथे घर खरेदी करणं फारक कमी लोकांना शक्य होतं. मुंबईत घरांच्या होणाऱ्या एकापेक्षा एक महागड्या व्यवहारांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. कोट्यवधी रुपये खर्च करून येथे अनेक धनाढ्य लोक आलिशान फ्लॅट आपल्या नावे करतात. आता समोर आलेला नवा व्यवहारही तसाच आहे. मुंबईतील एक आलिशान ट्रिपलेक्स प्लॅट तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला आहे.
हा फ्लॅट मुंबईतील वाळकेश्वर या उच्चभ्रू भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आहे. हा फ्लॅट १८ हजार स्क्वेअर फूट एवढा मोठा असून, रियल इस्टेटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार उद्योगपती नीरज बजाज आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप) यांच्यात झाला आहे. आतापर्यंत भारतात झालेला हा सर्वात महागडा व्यवहार आहे. गेल्या महिन्यातच मुंबईमधील वरळी परिसरातील एक ३० हजार स्वेअर फुटांचं पेंट हाऊस उद्योगपती बी.के. गोयंका यांनी खरेदी केले होते. गोयंका हे वेलस्पन ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांनी हे पेंट हाऊस २४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा हा देशातील सर्वात मोठा व्यवहार ठरला होता. मात्र महिनाभरातच त्यापेक्षा मोठा व्यवहार बजाज आणि लोढा ग्रुपने केला आहे.
बजाज ग्रुपच्या डायरेक्टरनी लोढा मलबार टॉवरमधील वरचे तीन फ्लोअर बुक केले आहेत. ही इमारत राजभवनच्या जवळ आहे. प्रतिस्क्वेअर फुटाच्या हिशेबाने या फ्लॅमध्ये प्रति स्क्वेअर फूट १.४ लाख रुपये मोजावे लागले आहेत. मलबार हिल येथे बांधण्यात येत असलेल्या या ३१ मजली इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे. ही इमारत २०२६ मध्ये बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीमदील २९,३० आणि ३१ वा मजला बजाय यांनी खरेदी केला आहे.
सध्या बजाज कुटुंबीय मुंबईतील पेडर रोड येथील माऊंट युनिक इमारतीमध्ये राहतात. येथे बजाज कुटुंबीय इमारतीमधील सर्वात वरच्या मजल्यावर राहतं. मात्र ५० वर्षे जुन्या या इमारतीमध्ये आजच्या काळातील इमारतींप्रमाणे सोईसुविधा नाही आहेत. तर नव्या इमारतीमध्ये बजाज कुटुंबाला प्रायव्हेट रुफटॉपवर जाण्याची सोय असेल. तसेच स्विमिंग पूलही असेल. मिळत असलेल्या माहितीनुसार सोमवारी याबाबतचा व्यवहार झाला असून, त्यासाठी १५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी जमा करण्यात आली आहे.