मुंबई, दि. 27 - भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केल्यानंतर आज शेअर बाजार कोसळला आहे. भारताच्या या लष्करी कारवाईचा शेअर मार्केटवर विपरित परिणाम झाला आहे. शेअर बाजार 440 अंकांनी घसरून 31,159वर बंद झाला आहे. तर निफ्टीतही 136 अंकांची घसरण झाली असून, 9735 अंकांवर बंद झाला आहे. सेन्सेक्स 439.95 अंकांनी अथवा 1.39% टक्क्यांनी घसरून 31,159.81 अंकांवर बंद झाला.दरम्यान, भारत-म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. इंडो-म्यानमार सीमेजवळील लांग्खू गावाजवळ सकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही अशी माहिती लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिली आहे. भारताच्या या कारवाईचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. बँकिंग, मेटल, फार्मा, एफएमसीजीसह सर्व सेक्टरमध्ये याचा प्रभाव जाणवला असून, बाजारावरही दबाव वाढला होता. टीसीएस, कोल इंडिया, अंबुजा सिमेंटचे शेअर सुस्थितीत आहेत.
नवरात्रीनिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सराफा व्यावसायिक वास्तूपाल रांका म्हणाले, उत्सवामुळे काही प्रमाणात लग्नासाठी दागिने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. गेला काही काळ सराफा बाजारात असलेली मरगळ निघून गेली आहे. मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हि-याचे बनविण्याकडे देखील कल वाढत आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सवकाळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.पवन अष्टेकर म्हणाले, सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि भावात झालेली घट यामुळे बाजारात चांगले वातावरण आहे. नवरात्रीच्या आणि पुढे दसरा-दिवाळीमध्ये बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या टेम्पल ज्वेलरी यांना विशेष मागणी आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आतापासूनच मागणी नोंदविली जाऊ लागली आहे. पारंपरिक दागिन्यांबरोबरच नव्या डिझाईनलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील सराफांच्या दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर येणा-या लग्नसराईपर्यंत तेजी टिकून राहिल, असा व्यावसायिकांचा अंदाज वर्तवला आहे.देवीची मूर्ती, चांदीचे साहित्य अशा साहित्यांना या काळात विशेष मागणी असते. दस-याला सोन्याच्या मागणीत अधिक वाढ होते. दागिने, वेढणी, आपट्याची सोन्याची पाने या दिवशी खरेदी केली जातात. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्यासाठी देखील या दिवसाची निवड केली जाते. त्यानंतर पुन्हा दिवाळीची खरेदी सुरू होते. वस्तू आणि सेवा कराची नागरिकांना सवय होत आहे. अंमलबजावणीच्या अडचणीचे पहिले काही दिवस गेले असल्याने, त्याचा खरेदीवर काही प्रतिकूल परिणाम होताना दिसत नाही. सोन्याचा प्रतितोळा भाव 29 हजार 800 रुपये असून, चांदीचा प्रतिकिलो दर 39 हजार 500 आहे.