मुंबई : दिवाळी सणादरम्यान सोन्याची बाजारपेठ तेजीत आहे. सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली असली तरीही मुंबईतल्या सराफ बाजारातील सोने खरेदी-विक्रीसाठी गर्दी कमी झालेली नाही. धनत्रयोदशीला मुंबईतील सोने बाजारपेठेत तब्बल २५० कोटींची उलाढाल झाली आहे. दिवाळी पाडव्याला हीच उलाढाल ३०० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धनत्रयोदशीला सोन्याच्या बाजारपेठेत राष्ट्रीयस्तरावर २४ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले. मुंबईत हा आकडा २५० कोटी होता. सोन्याची जास्त खरेदी धनत्रयोदशीला झाली. आता पाडव्यालाही खरेदी-विक्रीचा ट्रेंड कायम राहील. पुरुषांपेक्षा महिलावर्गांकडून सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून, हलक्या वजनाच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे, हा ट्रेंड कायम आहे. सोन्याची नाणीही जास्त प्रमाणात विकली जात आहेत.
दिसायला चांगले; पण हलक्या वजनाचे दागिने खरेदी केले जात आहेत. याबरोबरच जुने सोने मोडून नवे सोने खरेदी केली जात आहे. सोनसाखळी व कानातले दागिने अधिक खरेदी होत आहेत. दिवाळी हा मुहूर्त असला तरी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जात आहे.-निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते
पाडव्याला सोने खरेदीचा मुहूर्त आहे. तर दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुसऱ्या दिवशी प्रदोषकालात करावे, असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय, व्रतपर्व विवेक आदी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे. त्याप्रमाणे यावर्षी शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात म्हणजे सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून रात्री ८:३५ पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करायचे आहे. १९६२, १९६३ आणि २०१३ मध्येही दोन दिवस प्रदोषकाळात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी- कुबेरपूजन केले होते.-दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक