नवी दिल्ली - ट्विटर खरेदी केल्यापासून जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इलॉन मस्क यांची संपत्तीत सातत्याने घसरत आहे. टेस्ला किंग इलॉन मस्क यांची संपत्ती घसरण्याचा वेग एवढा अधिक होता की, त्यांना गेल्या केवळ 24 तासांत 7.75 अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे 6,42,73,11,37,500 रुपयांचा मोठा झटका बसला आहे. इलॉन मस्क यांना 20 डिसेंबरला सर्वात मोठा झटका बसला. टेस्लाचे शेअर्समध्ये एवढी मंदी आणि की हा शेअर तब्बल 8 टक्क्यांनी घसरला.
दर सेकंदाला 74 लाख रुपयांचा झटका -
इलॉन मस्क यांच्यासाठी 2022 हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. त्यांच्यासाठी ट्विटर गळ्यात फास बनले आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क यांच्या बिझनेसला झटक्यावर झटके बसत आहेत. 20 डिसेंबरचा आकपा पाहून तुम्हालाही चक्रावून जाल. या दिवशी टेस्लाचा शेअर तब्बल 8 टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि कंपनीचे शेअर्स दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. टेस्ला शेअर्सच्या या घसरणीमुळे मस्क यांचे 24 तासांत 7.75 अब्ज डॉलर्स आणि प्रत्येक सेकंदाला 74,39,017 रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घसरणीनंतर मस्क यांची संपत्ती 144 अब्ज डॉलरवर आली आहे. त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुटही गमावला आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून इतर कंपन्यांकडे मस्क यांचे दूर्लक्ष झाले असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. टेस्ला यांनी काही शेअर्स विकल्यामुळे त्यांचा वाटाही कमी झाला आहे. ट्विटरमुळे इतर कंपन्यांकडे त्यांचे दूर्लक्ष होत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. केवळ डिसेंबर महिन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, मस्क यांना रोज 2 अब्ज डॉलर्सहून अधिकचे नुकसान होत आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांची संपत्ती 189 अब्ज डॉलर होती, जी 20 डिसेंबर रोजी 144 बिलियन डॉलरवर आली आहे.