नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली असताना आता सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांनंतर देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणा, सोयाबीन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीत घसरण (Edible Oil Price Down) होताना पाहायला मिळत आहे. परंतु परदेशात तेलाच्या किमती अद्यापही कमी झालेल्या नाहीत. देशांतर्गत बाजारात सोयाबान, मोहरी, शेंगदाणा, पामोलिन यासह अनेक खाद्यतेलाच्या दरात प्रतिलीटर 7 ते 10 रुपयांची घसरण झाली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्यानुसार, इंडोनेशियाने निर्यात सुरू केल्यानंतर ही घसरण झाली आहे. सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किमती जवळपास 100 डॉलरने कमी झाल्या आहेत. पण परदेशात अद्यापही सूर्यफूल तेलाच्या किमती वाढलेल्याच आहेत. भारतात देशांतर्गत बाजारातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पण वाढत्या महागाईत मोदी सरकारने काही दिलासा दिला. नुकताच इंडोनेशिया सरकारने 23 मेपासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची घोषणा केली.
सध्या देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाचा दर सर्वोच्च पातळीपेक्षा 45 ते 50 रुपये प्रतिलिटर इतका कमी आहे. त्यानुसार, जर तुम्ही एका महिन्यात 10 लीटर तेल विकत घेतले तर तुम्ही 450-500 रुपयांपर्यंत सहज बचत करू शकता. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या मोठ्या राज्यांमध्ये मोहरीच्या तेलाची किंमत प्रति लिटर 170 रुपयांच्या खाली आहे.
यूपीच्या अनेक शहरांमध्ये मोहरीच्या तेलाची किंमत कमी आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजमध्ये मोहरीच्या तेलाची किंमत 180 रुपये प्रति लीटर इतकी नोंदवण्यात आली होती. त्याच वेळी मुझफ्फरनगर, शामली, फिरोजाबाद, मॅनपुरी येथे खाद्यतेल जवळपास सारख्याच दरात उपलब्ध होते.
गेल्या काही महिन्यांपासून परदेशात खाद्यतेल महाग झाल्याने आयात कमी झाली होती. त्याचा परिणाम भारतातील किमतीवर झाला. परंतु आता स्थानिक मागणी सोयाबीन, भुईमूग आणि मोहरीने भागवली जात आहे. तसेच इंडोनेशियाने तेलाच्या किमती सुमारे 100 डॉलरने कमी केल्या आहेत. यातून आयातही सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.