नवी दिल्ली : सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यामुळे गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडांकडे वाढला आहे. मात्र, म्युच्युअल फंडांच्या सतत वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे बँकांकडे येणाऱ्या ठेवींचा ओघ कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या एका अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाने ‘बँक ठेवींना म्युच्युअल फंडांचा किती गंभीर धोका आहे?’ या नावाचा एक अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, म्युच्युअल फंडात जोखीम आहे तरीही म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. बहुतांश लोकांना जोखीम पत्करण्यास सवय होत आहे, असे यावरून दिसते.
२४.८% दराने म्युच्युअल फंड उद्याेगाची वाढ २०१९-२० ते २०२२-२३ या ३ वर्षांच्या काळात झाली. ३९.४२ लाख कोटी रुपयांवर म्युच्युअल फंड उद्योग या काळात पोहोचला. या काळात बँकांच्या ठेवीतील वाढ मात्र अवघी १० टक्के राहिली.
‘एसआयपी’तून विक्रमी गुंतवणूक
ऑगस्ट २०२३ मध्ये एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात विक्रमी १५,८१३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
कोविडच्या आधी म्युच्युअल फंडांची गुंतवणुकीत हिस्सेदारी १३ टक्के होती. ती आता वाढून २० टक्के झाली आहे.