नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात अस्थिरता असतानाही म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) गुंतवणूक सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये गुंतवणुकीत 44 टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, इक्विटी म्युच्युअल फंडला गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. खरे तर निव्वळ गुंतवणूक वाढल्याचा हा 13वा महिना आहे.
AMFI जारी केली आकडेवारी -असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाने (AMFI) शुक्रवारी आपले आकडे जारी केले. या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 19,705 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. तर जानेवारी महिन्यात हा आकडा 14,888 कोटी रुपये एवढा होता.
SIP चे योगदानही वाढले - रशिया-युक्रेन युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला बाजारात मोठी अस्थिरता होती. यानंतरही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली आहे. तसेच, SIP योगदानदेखील मार्च महिन्यात वाढून 12,328 कोटी रुपयांवर गेले आहे. हे फेब्रुवारीतील 11,438 कोटी रुपयांपेक्षा सुमारे 8 टक्के अधिक आहे. मार्च 2022 मध्ये सर्व श्रेणींमध्ये गुंतवणूक आली आहे. 8,170 कोटी रुपयांच्या निव्वळ गुंतवणुकीसह मल्टी-कॅप फंड श्रेणीत सर्वाधिक पैसा आला.
येथेही वाढतेय गुंतवणूक - खरे तर, डेट फंड्ससाठी स्थिती काही प्रमाणात विपरीत होती. मार्चमध्ये डेट फंडातून 1.15 लाख कोटी रुपये काढले गेल्याचे दिसून आले. तर, इक्विटी म्हणजेच शेअर्समधील गुंतवणूकीशी संबंधित योजनांमधील निव्वळ गुंतवणूक मार्च, 2021 पासूनच वाढू लागली. हे गुंतवणूकदारांतील अशा योजनांसंबंधातील पॉझिटिव सेंटीमेंट दर्शवते. यापूर्वी, या योजनांमुधून जुलै, 2020 पासून फेब्रुवारी, 2021 पर्यंत सातत्याने पैसे काढले गेले आहेत.