मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी २०१७-१८मध्ये शेअर बाजाराशी संबंधित फंड योजनांमध्येच अधिक रस दाखवल्याने या वर्षात ‘इक्विटी लिंक’ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत १७० टक्के वाढ झाली.
गुंतवणूकदारांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक न करता ती फंड व्यवस्थापकांमार्फत करता येते. यापैकी काही योजना थेट शेअर बाजाराशी संबंधित असतात. त्यातील पैसा किमान तीन वर्षे काढता येत नाही. त्यावर प्राप्तीकरात सवलतही मिळते. या योजनांना ‘इक्विटी लिंक्ड बचत योजना’ (ईएलएसएस) असे म्हणतात. गुंतवणूकदारांची रक्कम २०१७-१८ या आर्थिक वर्षांत १५८५ कोटींच्या घरात गेली. या गुंतवणुकीच्या बाजार मूल्यात २७ टक्के वाढ होऊन ते ३१ मार्च २०१७ अखेर ८०,९२७ कोटी रुपये झाले. म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीत ३८ टक्के वाढ होऊन ती ६.९० लाख कोटी रुपये झाली आहे.
नफ्यावर कर भरावा लागू नये यासाठी गुंतवणूकदार तीन वर्षे मर्यादा असलेल्या गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून आले. त्यातूनच ईएलएसएसमधील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली, असे मत अॅक्सिस म्युच्युअल फंडचे अश्विन पाटणी यांनी व्यक्त केले.
बॅलन्स फंडात ३० टक्के घट
गुंतवणूकदारांकडून पैसा घेऊन त्याची शेअर बाजार व रोखे या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांना ‘बॅलन्स फंड’ म्हटले जाते. अशा बॅलन्स फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात पाठ फिरवल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या योजनांमधील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली. २०१६-१७मध्ये अशा योजनांमधील गुंतवणूक ७,१३६ कोटी होती. ती मागील आर्थिक वर्षात ५,०२६ कोटी रुपयांवर आली.
शेअर्सशी संबंधित फंडांकडे ‘म्युच्युअल’ ओढ, २०१७-१८मध्ये १७० टक्के वाढ
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी २०१७-१८मध्ये शेअर बाजाराशी संबंधित फंड योजनांमध्येच अधिक रस दाखवल्याने या वर्षात ‘इक्विटी लिंक’ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत १७० टक्के वाढ झाली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:38 AM2018-05-08T01:38:55+5:302018-05-08T01:38:55+5:30