मुंबई : भारतीय बनावटीच्या उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि देशातील उत्पादन क्षेत्राकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेची घोषणा केलेली असतानाच, आता म्युच्युअल फंड कंपन्यांनीही यातील संधी जोखून नवी योजना आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.उपलब्ध माहितीनुसार, आयसीआयसीआय प्रु., प्रीमेशिया, बिर्ला सन लाईफ अशा तीन कंपन्यांनी यात विशेष रस दाखवित या दृष्टीने विशेष योजना तयार करत या संदर्भातील प्रस्ताव सेबीकडे अनुमतीसाठी दाखल केल्याचे वृत्त आहे. ‘मेक इन इंडिया’अंर्तगत देशातील उत्पादन क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देणार असून त्याद्वारे या क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर, या क्षेत्रात आगामी पाच वर्षांत अनेक नव्या घडामोडी अपेक्षित आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर संधी देखील उपलब्ध होणार आहे. नेमका याचाच फायदा या क्षेत्रातील कंपन्या आणि अर्थातच गुंतवणूकदार व्हावा, याकरिता म्युच्युअल फंड कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ मिशनकरिता विशेष योजना सादर करण्याची तयार केली आहे. याद्वारे प्रामुख्याने, शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या विविध उत्पादन क्षेत्रातील कंपन्या तसेच, खाजगी कंपन्यांचे वित्त उभारणीचे रोख यामध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्राचा जसा विकास होईल, त्याचे थेट प्रतिबिंब हे म्युच्युअल फंड योजनांच्या या फंडाच्या कामगिरीवर उमटेल. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंडांचेही आता ‘मेक इन इंडिया‘
By admin | Published: February 17, 2015 12:29 AM