Join us

कर्ज निधीतील गुंतवणुकीबाबत म्युच्युअल फंडांनी सावध राहावे; सेबीप्रमुखांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 4:46 AM

कर्ज निधीत (डेब्ट फंड) गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा बाजार नियामक सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांनी दिला आहे.

मुंबई : कर्ज निधीत (डेब्ट फंड) गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा बाजार नियामक सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांनी दिला आहे.त्यागी म्हणाले, संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बहुतांश गुंतवणूक येत असली तरीही म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी औद्योगिक पत्रांमधील आपल्या गुंतवणुकीचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. काहीही झाले तरी कर्ज जोखीम म्युच्युअल फंड उद्योगावरच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी ही गुंतवणूक त्यांच्या लेखापुस्तकांतच राहते. बाह्य घटक येथे कामास येत नाहीत. कर्ज साधनाद्वारे होणारी गुंतवणूक दीर्घकालीन असो की अल्पकालीन याच्या जोखमीबाबत सावध असणे आवश्यकच आहे. आपल्या वहीखात्यात त्याचे मूल्य किती असावे, हे फंड व्यवस्थापकांनी ठरवायलाच हवे. त्यागी म्हणाले, म्युच्युअल फंडांकडे १२.३ लाख कोटींच्या मालमत्तांचे व्यवस्थापन आहे. त्यातील ११.५ लाख कोटींच्या मालमत्ता बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांच्या आहेत.काय आहे डेब्ट फंड?समभाग (शेअर्स) आणि कर्ज निधी (डेब्ट फंड) यांच्यात फरक आहे. गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या कंपनीचे समभाग खरेदी करतो, तेव्हा तो आपल्या समभागाच्या रकमेच्या प्रमाणात कंपनीचा मालक बनतो. कारण गुंतवणूकदार समभागांच्या रूपात हिस्सेदारी खरेदी करीत असतो.कर्ज निधीद्वारे जेव्हा गुंतवणूक केली जाते, तेव्हा गुंतवणूकदार संबंधित कंपनीला कर्ज देत असतो. म्युच्युअल फंडांकडून कॉर्पोरेट बॉण्ड, सरकारी रोखे, ट्रेझरी बिल, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स इत्यादी अनेक प्रकारच्या कर्ज रोख्यांच्या माध्यमातून कर्ज निधीत गुंतवणूक केली जाते. यात जोखीम कमी समजली जाते. तसेच परतावाही कमी मिळतो.