लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे काढायचे असल्यास आता ते तीन दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने जारी केले आहेत.
आतापर्यंत आपल्या खात्यातील पैसे काढल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी गुंतवणूकदारांना १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता सात दिवसांनी कमी करत तीन दिवसांवर आणण्यात आला आहे. तसेच, म्युच्युअल फंडातील योजनेतर्फे जो बोनस दिला जातो, तो देखील गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये अथवा पुनर्गुंतवणुकीमध्ये करण्याची कार्यवाही सात दिवसांत करावी, असेही सेबीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी बोनस जमा होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत होता.