एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग फंडएचडीएफसी म्युच्युअल फंडाने रिटायरमेंट सेव्हिंग फंड या नावाने नवीन योजना प्राथमिक भांडवल बाजारपेठेतून भरणा स्वीकारण्यासाठी आणली आहे. सुरुवातीला ही योजना १९ फेब्रुवारीपर्यंत खुली राहील. त्यानंतर मग ५ दिवसांच्या आत युनिटचे वाटप झाल्यानंतर कायमस्वरूपी खरेदी-विक्रीसाठी निव्वळ मालमत्ता मूल्यावर आधारित किमतीवर खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध राहील.सुरुवातीला १० रुपये दर्शनी किमतीचे युनिट दर्शनी किमतीला उपलब्ध राहील. किमान गुंतवणूक ५००० रुपये आणि त्यानंतर १००० रुपयांच्या पटीत कितीही करता येईल. गुंतवणुकीला ५ वर्षांचा लॉक इन कालावधी राहील. या गुंतवणुकीला सरकारने नोटिफाइड पेन्शन फंड म्हणून मान्यता दिलेली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांच्या गुंतवणूक कर सवलतीकरता ती मान्य राहील.वर्षानुवर्षे गुंतवणूकदारांनी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ही योजना निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगले जावे यासाठी वापरली. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार या योजनेचे व्याजदर कमी कमी होत जाणार हे नक्की. १२ टक्क्यावरून व्याजदर ८.७० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे १० वर्षे मुदतीच्या सरकारी कर्जरोख्यावर मिळणारे व्याज आणि त्या सरकारी कर्जरोख्याचे बाजारातले भाव याचा विचार करून जो उत्पन्न दर असेल त्या दराशी व्याज निगडित असेल. यामुळे पूर्वीसारखे व्याजदर कायम राहणार नाहीत, तर दरवर्षी एप्रिल महिन्यात व्याजदर जाहीर होतील. बाजारातील व्याजदर आणि त्यातील बदल याबाबत काय घडू शकेल याचा अंदाज करायचा ठरवले तर पीपीएफचा व्याजदर भविष्यात सात ते साडेसात टक्क्यांपर्यंत खाली आला तरी आश्चर्य वाटणार नाही. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार असे आहेत की त्यांना आजसुद्धा पीपीएफला प्राधान्य द्यावेसे वाटते. पीपीएफच्या पैशाला १०० टक्के सुरक्षितता आहे, कारण हा पैसा सरकारकडे दिलेला असतो. परंतु, या सुरक्षिततेची फार मोठी किंमत मोजावी लागते याची अनेक गुंतवणूकदारांना कल्पनासुद्धा नसते. ही किंमत कशी मोजायची यासाठी गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडाची ऋणपत्रात असलेली गुंतवणूक आणि शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक याची आकडेवारी बघितलीच पाहिजे.११ सप्टेंबर २००० या दिवशी ज्या व्यक्तीने फक्त १०,००० रुपये एचडीएफसी ग्रोथ फंड या योजनेत भरले व भांडवलवृद्धी पर्याय घेतला तर या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०१५ या दिवशी १३,२००० रुपये झाले किंवा गुंतवणुकीत १३ पट वाढ झाली. शेअर्स गुंतवणुकीची जोखीम असू नये म्हणून याच दिवशी सुरू झालेल्या एचडीएफसी इन्कम फंड या योजनेत जर गुंतवणूक केली असती तर फक्त ३२,८१० रुपये झाले असते. यामुळे १५ वर्षांच्या कालावधीत ज्याने गुंतवणुकीची जोखीम स्वीकारली त्याने जास्त भांडवलवृद्धी मिळवली असे दिसून येते. म्हणून शेअर्समध्ये गुंतवणूक असली पाहिजे आणि ती दीर्घकालीन असली पाहिजे.निवृत्तीनंतरचे जीवन चांगले जावे, यासाठी या योजनेत गुंतवणूक हवी त्यात पुन्हा गुंतवणुकीसाठी तीन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी इक्विटी प्लॅन घ्यायला हवा ज्यात एकूण रकमेच्या ८० टक्के रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जाईल. ज्याचा बाजारावर विश्वास नाही किंवा रिटायरमेंटचा फार विचार करता येणार नाही असे जर असेल तर मग फक्त ६० टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक आहे असा हायब्रिड इक्विटी प्लॅन घ्यायला हवा आणि जर बाजाराबद्दलची खूपच भीती डोक्यात असेल किंवा निवृत्त होण्यासाठी थोडासा कालावधी राहिला आहे अशा गुंतवणूकदारांनी हायब्रिड डेट प्लॅन घ्यायला हवा. ज्यामध्ये शेअर्स गुंतवणुकीचे प्रमाण फक्त ३० टक्के राहील आणि कर्जरोख्यातील गुंतवणुकीचे प्रमाण ७० टक्के राहील.बाजारात किती चढ-उतार झाले तरी बाजाराच्या बाबतीत एक महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की, देशाच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा वेग अधिक महागाई वाढीचा दर याची बेरीज करता किमान एवढी वाढ बाजाराने द्यायलाच हवी असे म्हटले जाते. आणि जर सरासरी वाढ विचारात घेतली तर हे गणित बरोबर आहे, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.- प्रमोद पुराणिक------
म्युच्युअल फंड
By admin | Published: February 05, 2016 11:57 PM