लंडन: भारतातील बँकांना सुमारे ९ हजार कोटी रुपयांना फसवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने आता मूळ रक्कम परत करण्याच्या आपल्या आॅफरचा अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मायकेल याच्या प्रत्यार्पणाशी अजिबात संबंध नाही, असा खुलासा केला आहे.ख्रिस्तियन मायकेल याला दुबईतून प्रत्यार्पण करून मंगळवारी रात्री भारतात आणल्यानंतर लगेचच विजय मल्ल्याने आपण बँकांकडून घेतलेल्या कर्जाची मूळ रक्कम परत करायला तयार आहोत, असे म्हटले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे लंडनमधील न्यायालयात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मायकेलच्या प्रत्यार्पणाप्रमाणे आपलेही झाले, तर आपण अडचणीत येऊ , या भीतीनेच त्याने मुद्दलाची रक्कम देण्याची तयारी दर्शवली, अशी चर्चा सुरू झाली होती.विजय मल्ल्याने बुधवारीच कर्जाची १00 टक्के रक्कम फेडण्याची तयारी दर्शवली होती. तसे आपण कर्नाटक उच्च न्यायालयाला कळविले आहे, असे त्याने म्हटले होते. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असल्याचा उल्लेखही विजय मल्ल्या याने केला होता. बँका व भारत सरकार यांनी माझी सेटलमेंटची आॅफर स्वीकारावी, अशी विनंती त्याने केली होती. मात्र त्याने केवळ मुद्दल रक्कमच फेडण्याची तयारी दर्शवली असून, तो त्यावरील व्याज देण्यास तयार नाही.>कृपया पैसे ध्या आणि हे प्रकरण थांबवामायकेलच्या प्रत्यार्पणाचा व आपण दिलेल्या आॅफरचा संबंध नाही, असा खुलासा विजय मल्ल्याने लगेचच केला. मल्ल्याने म्हटले आहे की, माझी सेटलमेंट आॅफर व दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रत्यार्पणाचा संबंध का लावला जात आहे, हेच समजत नाही. मी कुठेही असेन, पण माझी एकच विनंती आहे. कृपया पैसे घ्या आणि हे प्रकरण थांबवा.
मायकेलच्या प्रत्यार्पणाशी माझ्या आॅफरचा संबंध नाही, विजय मल्ल्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:38 AM