नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि आरोग्याची सर्वाधिक चिंता सतावत असल्याची माहिती सरकारी हेल्पलाइन ‘हेल्पएज एल्डरलाइन’वर आलेल्या फोन कॉलच्या अभ्यासातून समोर आली. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १४५६७ वर ८७,२१८ वर फोन आले.
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘हेल्पएज एल्डरलाइन’ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. हेल्पलाइन ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत काम करते.
पुरुषांची संख्या ७३%
हेल्पएज इंडियाचे मिशन प्रमुख डॉ. इम्तियाज अहमद म्हणाले की, मदत मागण्याच्या बाबतीत ज्येष्ठ महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या दुपटीपेक्षाही अधिक राहिली. हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांत ७३ टक्के पुरुष, तर २७ टक्के महिला होत्या.
किती आजी-आजोबांनी कशासाठी केले कॉल?
२१% वृद्धाश्रम, देखभाल केंद्रे, रुग्णालये, चिकित्सक आणि देखभाल सुविधा देणाऱ्यांच्या माहिती
३३% कायदेशीर मुद्दे, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि भरण-पोषण अधिनियमासंबंधी मार्गदर्शन
४१% छोटी घरगुती कामांबाबत मदत, शेजाऱ्यांसोबतच्या वादावर तोडग्यासाठी विनंती
४% ज्येष्ठ नागरिकांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाशी संबंधित होते.