Join us  

नोटाबंदीने केरळच्या पर्यटन क्षेत्राला फटका

By admin | Published: January 06, 2017 1:55 AM

नोटाबंदी लागू करताना केंद्र सरकारने ५० दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल, अशी ग्वाही देऊनही अजूनही स्थिती ‘जैसे थे’ आहे.

तिरुअनंतपुरम : नोटाबंदी लागू करताना केंद्र सरकारने ५० दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल, अशी ग्वाही देऊनही अजूनही स्थिती ‘जैसे थे’ आहे. ८ नोव्हेंबरपासून नोटाबंदीने उद्योग-व्यवसायासह अनेक क्षेत्रांना फटका बसला असून, केरळच्या पर्यटन क्षेत्राचे तब्बल १ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यामुळे विदेशी आणि भारतीय पर्यटकांनी केरळकडे पाठ फिरविल्याने केरळच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या पर्यटन क्षेत्राला जबर फटका बसल्याचे राज्य सरकारनेच स्पष्ट केले आहे.नैसर्गिक सौंदर्यासह सागरकिनारा लाभलेल्या केरळला ‘देवभूमी’ म्हटले जाते. नैसर्गिक सौंदर्याची लयलूट करण्यासाठी केरळात देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते; परंतु नोटाबंदीपासून केरळला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. विदेशी पर्यटकांच्या संख्येत १० ते १५, तर भारतीय पर्यटकांच्या संख्येत २० ते ३० टक्के घट झाली, अशी माहिती केरळचे पर्यटनमंत्री कदकम्पल्ली सुरेंद्रन यांनी दिली. केरळच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा असतो. दरवर्षी केरळला पर्यटनातून २५ हजार कोटींचा महसूल मिळतो. हाउसबोट उद्योग बुडण्याच्या स्थितीत...हाउसबोट हा उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत आहे. तथापि, पर्यटनाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी हमी सुरेंद्रन यांनी दिली. विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेल्या केरळमधील काही ठिकाणे जलविहारासोबत विविध आकर्षक जलक्रीडेसाठी प्रसिद्ध आहेत. राज्य सरकार एकूण ७९ जलक्रीडा प्रकार निश्चित करून त्यासाठी खास प्रकल्प राबविणार आहे. मलबार भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आर्थिक मदतही देण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पर्यटन विभागाने केरळ पायाभूत गुंतवणूक निधी मंडळाकडे १ हजार कोटी मागितले असून, ३६२ कोटी रुपये लवकरच मंजूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.