Join us

निफ्टी दसहजारी; सेन्सेक्सचाही उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:01 AM

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ओलांडलेला दहा हजार अंशांचा टप्पा, तसेच मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने गाठलेले नवीन शिखर या दोन घटना गतसप्ताहातील प्रमुख आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ओलांडलेला दहा हजार अंशांचा टप्पा, तसेच मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने गाठलेले नवीन शिखर या दोन घटना गतसप्ताहातील प्रमुख आहेत. सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात झालेली वाढ उल्लेखनीय आहे. बाजाराची सूत्रे परकीय वित्तसंस्थांकडून पुन्हा एकदा देशी परस्पर निधी आणि लहान गुंतवणूकदारांच्या हाती येत असल्याची शुभंकर चिन्हे दिसून आली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हा गतसप्ताहात दहा हजार अंशांच्या अगदी जवळ पोहोचला होता. गुरुवारी त्याने १० हजार अंशांचा टप्पा ओलांडला. मात्र त्यानंतर, त्यामध्ये काहीशी घसरण झालेली बघावयास मिळाली. मात्र, सप्ताहाच्या अखेरीसही त्याने १० हजार अंशांपेक्षा वरची पातळी कायम राखली. सप्ताहाच्या अखेरीस तो मागील बंद निर्देशांकापेक्षा ९९.२ अंशांनी वाढून १००१४.५० अंशांवर बंद झाला.मुंबई शेअर बाजारातही तेजी दिसून आली. याला अपवाद राहिला तो मंगळवार आणि शुक्रवारचा. या दोन दिवशी निर्देशांक खाली येऊन बंद झाला. गुरुवारी या निर्देशांकाने ३२६४२.६६ अशी नवीन उच्चांकी भरारी घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो काहीसा खाली येऊन ३२३०९.८८ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये २८०.९९ अंशांनी वाढ झाली.अमेरिकेतील व्याजदरांबाबत मिळालेले संकेत आणि बाजारातील तेजी, यामुळे परकीय वित्तसंस्थांनी खरेदी केली असली, तरी देशी परस्पर निधी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे बाजारात तेजी टिकून राहिलेली दिसली.आगामी सप्ताहात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्यामुळे, त्यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून पतधोरणाचा तिमाही आढावा घेतला जाणार आहे, तसेच अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारे पीएमआयचे अहवालही जाहीर होतील. त्याचबरोबर, काही महत्त्वाच्या आस्थापनांच्या तिमाही निकालांची घोषणाही होणार आहे.