Join us  

नाव, पत्ता, मोबाइल नंबर.... आधार कार्डावर नाव किती बदलता येते माहिती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 12:36 PM

भारतात आधार कार्डच्या स्वरूपात प्रत्येकाला विशिष्ट ओळखपत्र दिले जाते.

भारतात आधार कार्डच्या स्वरूपात प्रत्येकाला विशिष्ट ओळखपत्र दिले जाते. यात तुमचे नाव, पत्ता, लिंग आणि मोबाइल नंबर ही महत्त्वाची माहिती असते. काही कारणास्तव जेव्हा यात बदल होतो तेव्हा त्यानुसार आधार कार्डही अपडेट करावे लागते. कधी त्यातील चुकीची माहिती बदलता येते; परंतु ही माहिती किती वेळा बदलायची किंवा अपडेट करावी, याला मर्यादा आहेत. जाणून घेऊया कोणती गोष्ट बदलण्यासाठी नेमके काय नियम घालून दिलेले आहेत.

कोणता बदल किती वेळा ? आधारमध्ये तुम्हाला तुमचे नाव फक्त दोन वेळा अपडेट करता येते किंवा बदलता येते. तुमची जन्मतारीख केवळ एकदाच बदलता येईल. त्यामुळे आधार कार्ड काढताना ही तारीख नीट तपासून घ्यावी. पत्ता तुम्हाला कितीही वेळा अपडेट करता येईल. त्यामुळे नवीन घर घेतले किंवा राहण्याचा पत्ता बदलला तरी चिंता करण्याचे कारण नाही. आधार कार्डवरील लिंग बदलण्याची सुविधाही असते; परंतु एकदाच तुम्हाला यात बदल करता येतो. तुमचा योग्य मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट करणे हे आधार कार्ड केंद्रावर किंवा ऑनलाइन करणे शक्य आहे. 

मर्यादेपेक्षा जास्त बदल करणे शक्य आहे ? काही अडचणीच्या स्थितीत मर्यादा संपली तरी आधार कार्डमध्ये बदल करता येतो. अशा अपवादात्मक स्थितीत आधार कार्डात बदलासाठी आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागते. नाव, जन्मतारीख आणि लिंग यात अनेक वेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे. 

कोणती कागदपत्रे ? बदलासाठी आधारच्या प्रादेशिक कार्यालयाशी किंवा help@uidai.gov.in येथे संपर्क साधावा. नेमका कोणता बदल करायचा आहे व त्यामागचे कारण सांगावे लागेल. त्या बदलाच्या पुष्ठ्यर्थ लागणारी कागदपत्रे किंवा पुरावे सादर करावे लागतील.  विनंतीत तथ्य आढळल्यास क्षेत्रीय कार्यालय लागलीच अर्ज मंजूर करेल. योग्य न आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल. 

शुल्क भरावे लागते का ?  बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये इतके शुल्क लागते.  डेमोग्राफिक अपडेटसाठी ५० रुपये लागतात.

टॅग्स :आधार कार्डसरकार