Join us

इन्फोसिसला मिळाला 'आधार', चेअरमनपदी नंदन निलेकणी यांची झाली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 9:06 PM

अपेक्षेप्रमाणे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांची इन्फोसिसच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली आहे.

नवी दिल्ली, दि. 24 - विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर आलेल्या वादळाला शांत करण्यासाठी अखेर इन्फोसिसला आपले सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांचा चेअरमन म्हणून आधार मिळाला आहे. अपेक्षेप्रमाणे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांची इन्फोसिसच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून निलेकणी यांचं नाव चर्चेत होतं. निलेकणी यांनी इन्फोसिसनंतर देशातील आधार कार्ड व्यवस्था उभी करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. 

नंदन निलेकणी तब्बल पाच वर्ष इन्फोसिसच्या अध्यक्षपदी होते. 2007 पर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं. 2009 मध्ये त्यांनी इन्फोसिसला रामराम करत युआयडीएआईचं चेअरमन पद स्विकारलं होतं. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निडवणूक लढण्यासाठी राजीनामा दिला. नंदन निलेकणी यांनी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नंदन निलेकणी यांचे इन्फोसिसमध्ये 2.9 टक्के शेअर्स आहेत. नंदन निलेकणी यांना परत आणणे इन्फोसिसच्या फायद्याचंच आहे असं मत माजी सीफओ व्ही बालकृष्णन यांनी व्यक्त केलं होतं. निलेकणी जर परत आले तर त्यांना इन्फोसिसचा अध्यक्ष बनवावे', असंही व्ही. बालकृष्णन म्हणाले होते. 

निलेकणी यांच्या नियुक्तीसोबतच सध्याचे चेअरमन आर. शेषसायी आणि को-चेअरमन रवि व्यंकटेशन यांनीही आपआपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून राजीनामा देणारे विशाल सिक्का, संचालक मंडळाचे सदस्य जेफरी एस. लेहमन आणि जॉन एचमेंडी यांनीही संचालक मंडळाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.  

विशाल सिक्का यांनी नाव न घेता नारायणमुर्ती यांच्यावर आरोप केले होते. इन्फोसिस स्थापन करण्यामध्ये स्वतः मुर्ती, निलेकणी यांचा प्रामुख्याने पुढाकार होता. मुर्ती यांनी सिक्का यांचे आरोप फेटाळले. आता ज्या इन्फोसिसला मोठं करण्यात हात आहे त्याच निलेकणींचा कंपनीला आधार मिळाला आहे. 

विशाल सिक्का यांनी 18 ऑगस्ट रोजी इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्याच दिवशी संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. इन्फोसिसकडून पत्राद्वारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली.  

सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती.  कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती. 

काय म्हणाले होते विशाल सिक्का-

बरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले आहे. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर  अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला आहे.