चेन्नई : टाटा मोटर्सच्या नॅनो मोटारीचे ‘सर्वात स्वस्त मोटार’ अशा प्रकारे ब्रँंडिंग करण्यात चूक झाली व ही मोटार अपेक्षेनुसार न खपण्याचे हेही एक कारण आहे, अशी कबुली टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी येथे दिली.
ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या ११ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांचीही उत्तरे दिली.
नॅनो मोटारीसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात टाटा म्हणाले, नॅनोचे ‘परवडणारी मोटार’ असे ब्रँडिंग करण्याऐवजी ‘सर्वात स्वस्त मोटार’ असे ब्रँडिंग केले गेले ही एक चूक होती. याचा खुलासा करताना ते म्हणाले की, भारतात अजूनही मोटारीकडे एक चैनीची वस्तू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे बाजारातील सर्वात स्वस्त मोटार मी घेतली, असे कोणी अभिमानाने सांगत नाही.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नॅनोच्या ब्रँडिंगचा मुद्दा अधिक स्पष्ट करताना टाटा म्हणाले की, २५-२६ वर्षे वयोगटातील युवावर्ग डोळ््यापुढे ठेवून नॅनो विकसित करण्यात आली ती अपेक्षेहून अधिक यशस्वी झाली. फक्त ही मोटार ‘लॉन्च’ करण्यास एक वर्षाचा विलंब झाल्याने अनेक अफवा पसरल्या. टाटा नव्या संकल्पना घेऊन सुरु केल्या जाणाऱ्या कंपन्या (स्टार्टअप्स) आणि लोकांच्या आयुष्यात फरक पडेल, अशा गोष्टी करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
‘नॅनो’चे ब्रँडिंग चुकले; टाटांची कबुली
टाटा मोटर्सच्या नॅनो मोटारीचे ‘सर्वात स्वस्त मोटार’ अशा प्रकारे ब्रँंडिंग करण्यात चूक झाली व ही मोटार अपेक्षेनुसार न खपण्याचे हेही एक कारण आहे, अशी कबुली टाटा
By admin | Published: July 16, 2015 04:42 AM2015-07-16T04:42:01+5:302015-07-16T04:42:01+5:30