Join us

नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद; बाजारातही कार येणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 4:01 AM

नॅनोचे उत्पादन यापुढे करणार नाही, असे टाटा समूहाने आधीच जाहीर केले होते. त्याला अनुसरून फॅक्टरीतून नॅनोचे उत्पादन पूर्णपणे थांबले असून, हळूहळू ही कार अस्तंगत होत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : नॅनोचे उत्पादन यापुढे करणार नाही, असे टाटा समूहाने आधीच जाहीर केले होते. त्याला अनुसरून फॅक्टरीतून नॅनोचे उत्पादन पूर्णपणे थांबले असून, हळूहळू ही कार अस्तंगत होत जाणार, हे स्पष्ट झाले आहे. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांना परवडणारी कार म्हणून नॅनोचे स्वप्न पाहिले होते.जानेवारी महिन्यात फॅक्टरीतून एकही नॅनो कार तयार झाली नाही आणि विकलीही गेली नाही. या कारला एकूणच भारतीय बाजारपेठेत हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. जानेवारी २0१८ केवळ ८२ नॅनो कार तयार झाल्या आणि त्यापैकी ६२ कारच विकल्या गेल्या. नॅनोला प्रतिसादच मिळत नसल्याने टाटा समूहाला त्यात गुंतवणूक करण्यात रसही राहिलेला नाही.दुचाकी व चारचाकी वाहनांतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाबाबत बीएस-सहाद्वारे केंद्र सरकारने कडक धोरण अवलंबले आहे. तसे करण्यासाठी नॅनोमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच कारच्या रचनेतही अनेक बदल करावे लागतील. मुळात कारला अजिबातच मागणी नसताना, एवढी गुंतवणूक करण्याचे कारण नाही, असे कंपनीने ठरविले आहे. अधिक गुंतवणूक करण्याऐवजी उत्पादन ठरविणे व्यवहार्य ठरेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.भारतात अनेक जण आर्थिक विचार करून कार विकत घेण्याऐवजी दुचाकी वाहन विकत घेतात. पण कुटुंब वाढले की सर्वांना दुचाकीवरून प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुचाकी इतक्या नाही, तरी काहीशा अधिक किमतीत, एक लाख रुपयांत कार घेता यावी, असे रतन टाटा यांना वाटत होते. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले नाही.

टॅग्स :टाटाव्यवसाय