Join us

आयटीतील कपातीवर नारायण मूर्ती नाखूश!

By admin | Published: May 27, 2017 12:19 AM

आयटी कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या नोकरकपातीवर आपण नाखूश आहोत

बेंगळुरू : आयटी कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या नोकरकपातीवर आपण नाखूश आहोत, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक चेअरमन एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले आहे. आयटी कंपन्यांनी अलीकडे सुरू केलेल्या नोकरकपातीबाबत प्रतिक्रिया विचारली असता मूर्ती यांनी म्हटले की, ‘‘हे दु:खदायक आहे.’’इन्फोसिसने अलीकडेच नोकरकपातीची घोषणा केली आहे. आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या द्वैवार्षिक कामगिरी आढाव्यानंतर मध्यम आणि वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना गुलाबी पत्रे (नोकरीवरून काढण्यासंबंधीचे पत्र) देण्यात येणार आहेत, असे कंपनीने म्हटले होते. विप्रो आणि कॉग्निझंट या कंपन्याही मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत आहेत. खर्च कमी करण्यासाठी ही उपाययोजना केली जात असल्याचे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अमेरिकास्थित कॉग्निझंटने संचालक, सहउपाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष या पातळीवरील लोकांसाठी स्वेच्छा सेवा खंडण योजना आणली आहे. ही योजना स्वीकारणाऱ्यांना ६ ते ९ महिन्यांचे वेतन दिले जाईल. विप्रोने ६00 लोकांना नोकरी सोडण्यास सांगितल्याचे समजते. हा आकडा २ हजारांपर्यंत असू शकतो. हेड हंटर्स इंडिया या संस्थेच्या अंदाजानुसार, येत्या तीन वर्षांत आयटी क्षेत्रात १.७५ लाख ते २ लाख लोकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. मॅक्केन्सी अँड कंपनीनुसार ३-४ वर्षांत आयटीतील अर्धे मनुष्यबळ कालबाह्य होणार आहे. भारतात आयटी क्षेत्र हे सर्वाधिक नोकऱ्या देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तथापि, येत्या काही वर्षांत स्वयंचलितीकरणामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.इंडियानाकडून इन्फोसिससाठी पायघड्याभारतीय आयटी कंपन्यांनी त्या देशात अमेरिकी नागरिकांची नोकऱ्यांमध्ये भरती सुरू केल्यामुळे तेथील इंडियाना राज्याने इन्फोसिसला ३१ दशलक्ष डॉलरची सवलत देऊ केली आहे. ही सवलत करमाफी आणि विकास निधीतून एकरकमी अनुदान या स्वरूपात असेल. इतरही काही आयटी कंपन्यांसाठी इंडियानाकडून सवलत दिली जाणार आहे. इन्फोसिसने म्हटले की, कार्यालये उभारण्यासाठी कंपनी ८.७ दशलक्ष डॉलर खर्च करील. कंपनीला सरकारकडून सशर्त कर अनुदान आणि प्रशिक्षण अनुदान या स्वरूपात सवलत मिळेल.