इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्रह रोहन मूर्ती (Ekagrah Rohan Murty) याला २४० कोटी रुपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्रह हा आता देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे. एक्स्चेंज फाइलिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, एकग्रहला इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स मिळाले आहेत म्हणजेच त्याला इन्फोसिसमधील ०.०४ टक्के स्टेक मिळाला आहे. या करारानंतर मूर्ती यांची इन्फोसिसमधील भागीदारी ०.४० टक्क्यांवरून ०.३६ टक्क्यांवर आली आहे. 'ऑफ-मार्केट' मोडमध्ये हे ट्रान्झॅक्शन करण्यात आलंय.
नोव्हेंबरमध्ये नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आजी-आजोबा झाले. एकग्राचा जन्म गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी झाला. नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुलीदेखील आहेत. डिसेंबर तिमाहीच्या अखेरिस, अक्षता यांच्याकडे इन्फोसिसमध्ये १.०५%, सुधा मूर्तींकडे ०.९३% आणि रोहन यांच्याकडे १.६४% हिस्सा होता.
१९८१ मध्ये सुरुवात
१९८१ मध्ये अवघ्या २५० डॉलर्सच्या मदतीनं इन्फोसिसची सुरुवात झाली आणि आज ती जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीनं कॉर्पोरेट गव्हर्नन्सला नवा आयाम दिला आणि उद्योजकतेला लोकशाही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सुधा मूर्ती यांनी इन्फोसिसच्या सुरुवातीला २५० डॉलर्सचं योगदान दिलं होतं.
सुधा मूर्ती २५ वर्षांहून अधिक काळ इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख होत्या. डिसेंबर २०२१ मध्ये त्या या पदावरून निवृत्त झाल्या. मात्र तरीही त्या समाजसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांची राज्यसभेच्या सदस्य म्हणूनही नियुक्त झाल्या आहेत.