PM Modi Interview: येत्या 9-10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. तत्पूपूर्वी पंतप्रधान मोदींनी मनी कंट्रोलला एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भारताला G-20 चे अध्यक्षपद मिळणे, ऊर्जा क्षेत्रात भारताची प्रगती आणि जागतिक नेते भारताकडे कसे पाहतात, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
भारताला G-20 चे अध्यक्ष मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. यातून G-20 च्या अध्यक्षपदासाठी आमचा दृष्टिकोन योग्यरित्या प्रतिबिंबित होतो. आपल्यासाठी पृथ्वी एका कुटुंबासारखी आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे भविष्य इतर सदस्याशी जोडलेले आहे. म्हणूनच जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा कोणीही मागे राहत नाही. गेल्या 9 वर्षात आम्ही आपल्या देशातही 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या पद्धतीचा अवलंब केला आहे. आज या मॉडेलच्या यशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण झाली आहे.
जागतिक नेते भारताकडे कसे पाहतात? याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणतात, जेव्हा जागतिक नेते मला भेटतात, तेव्हा ते भारताकडे आशाळभूत नजरेने पाहतात. त्या लोकांचा विश्वास आहे की, भारताकडे खूप काही देण्यासारखे आहे. त्याला जागतिक स्तरावर आकार देण्यासाठी मोठी भूमिका बजावावी लागेल. हे G-20 प्लॅटफॉर्मद्वारे आमच्या कामाच्या समर्थनात दिसून आले आहे.
उर्जेच्या क्षेत्रात भारताने आतापर्यंत कशी प्रगती केली? याच्या उत्तरात मोदी म्हणाले, पॅरिसच्या बैठकीत मी सांगितले होते की, 2030 सालापर्यंत आमची 40 टक्के ऊर्जा जीवाश्म नसलेल्या पदार्थांपासून येईल. आम्ही आमच्या वचनाच्या 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2021 मध्येच ते साध्य केले. हे आपल्या ऊर्जेचा वापर कमी करून नाही तर नवीकरणीय ऊर्जा वाढवून घडले आहे. सौरऊर्जेची क्षमता 20 पटीने वाढली असून पवन ऊर्जेच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या 4 देशांमध्ये सामील झालो आहोत. सरकार इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी मोठी पाऊले उचलली जात आहेत. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे कामही सरकार करत आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ही खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे, पण देशाने ज्या पद्धतीने हे केले ते माझ्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे. सरकारवर जनतेचा विश्वास आणि सरकारचाही देशातील जनतेच्या क्षमतेवर विश्वास, यामुळेच हे शक्य झाले. महागाई ही जगासमोरील प्रमुख समस्या आहे. सरकारने महागाई नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारताच्या विकासामुळे जगाच्या हितालाही मदत होत आहे. भारतातील महागाई जगाच्या तुलनेत कमी आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.