Join us

JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 1:03 PM

JOB Alert : यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. त्यामुळे आयटी संबंधित शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ अमेरिकेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये आगामी काळात ऑटोमेशनुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील जवळपास 30 लाख नोकऱ्या कमी होतील, असे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी भारतीय आयटी कंपन्यांमधील रोजगारनिर्मितीचे चित्र सुखावणारी बाब आहे.

देशात सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या 1.6 कोटी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. मात्र, 2022 पर्यंत ऑटोमेशनमुळे 30 लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असा बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीमुळे आयटी कंपन्यांची तब्बल 100 अब्ज डॉलर्सची बचत होईल. त्यामुळे आगामी काळात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. RPA अर्थात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन हे एकप्रकारचे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे साचेबद्ध आणि जादा मेहनतीची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज लागणार नाही. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. एकट्या अमेरिकेत RPA मुळे 10 लाख नोकऱ्या जातील, असा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नोकरी गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे तरुण आहेत किंवा अगदी जुने कर्मचारी आहेत. फॉर्च्यून 500 लिस्टच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतात एप्रिल 2021 दरम्यान 2000 लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. 

कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएस (FIS) द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी स्थायी स्वरुपात गेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 4 टक्के होता. तर 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रेशर्समध्ये 11 टक्के लोकांनी स्थायी स्वरुपात नोकरी गमावली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 10 टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMII) ने मेमध्ये असे म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये 1 कोटीपेक्षी अधिक भारतीयांनी नोकरी गमावली आहे. बेरोजगारी दर 12 महिन्यातील सर्वोच्च आहे. हा दर 12 टक्के एवढा झाला आहे.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञानभारतनोकरी