डिसेंबर महिन्यात भारतातीलबेरोजगारीचा दर 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. 16 महिन्यांतील हा उच्चांक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली. मागील महिन्याच्या सुरुवातीला बेरोजगारीचा दर 8.00 टक्के होता. आकडेवारीनुसार, शहरांमधील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 10.09 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील महिन्यात 8.96 टक्के होता. त्याचवेळी ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55 टक्क्यांवरून 7.44 टक्क्यांवर आला आहे.
काय म्हणतात जाणकार?
बेरोजगारीच्या दरात झालेली वाढ दिसते तितकी वाईट नसल्याचे मत सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी व्यक्त केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. याचे कारण देताना ते म्हणाले की, यापूर्वी कामगार सहभागाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. त्यांच्या मते, डिसेंबरमध्ये ते 40.48 टक्क्यांपर्यंत वाढले, जो 12 महिन्यांतील उच्चांक आहे.
यापूर्वी एनएसओच्या नोव्हेंबरच्या जारी केलेल्या डेटानुसार शहरी भागांमध्ये 15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगारी दर 9.8 टक्क्यांवरून घसरून 7.2 टक्क्यांवक आला आहे. ही आकडेवारी 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहिसाठी आहे. रिपोर्टनुसार यामुळे कोरोना विषाणूच्या महासाथीनंतर स्थिर आर्थिक रिकव्हरीच्या बाजूने संकेत मिळत आहेत. कोरोना महासाथीच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. दरम्यान शहरी भागातील महिलांमधील बेरोजगारी दर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत एका वर्षा पूर्वीच्या 11.6 टक्क्यांनी घसरून 9.4 टक्के झाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत हा दर 9.5 टक्के होता.