Join us  

Bank Strike : सर्वसामान्यांना दिलासा, बँकांचा संप मागे, कर्मचारी संघटनेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 8:16 AM

Bank Strike : यापूर्वी बँक कर्मचारी संघटनेने खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मागण्यांसाठी संप करण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : बँकेच्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. शनिवारी म्हणजेच आज होणारा बँकांचासंप आता होणार नाही. दरम्यान, संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या निर्णयानंतर आज झालेल्या बँकांचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहणार आहे. यापूर्वी बँक कर्मचारी संघटनेने खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मागण्यांसाठी संप करण्याची घोषणा केली होती. या संपात अधिकारी संघटना आधीच सहभागी नव्हती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांच्या सामान्य कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता कामकाज सुरळीत सुरू राहणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) शनिवारी प्रस्तावित केलेला देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या बहुतांश मागण्यांवर सहमती दर्शवल्यानंतर संप मागे घेतला आहे. या निर्णयानंतर सर्व बँकांमधील कामकाज सुरळीत सुरू राहणार असून कोणत्याही अडथळ्याविना व्यवहार करता येणार आहेत.

सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने आणि बँकेने या समस्येचे द्विपक्षीय निराकरण करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आमचा संप स्थगित करण्यात आला आहे. बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. महिन्याचा तिसरा शनिवार 19 नोव्हेंबर रोजी येत आहे. या दिवशी बँका खुल्या राहतात. आता संप संपल्यानंतर तुम्ही तुमचे काम मार्गी लावू शकता, असे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले.

या महिन्यात कोणतीही अतिरिक्ट सुट्टी नाहीनोव्हेंबर महिन्यात एकूण 10 दिवस सुट्टी आहेत. मात्र, शिलाँग सर्कल वगळता उर्वरित महिनाभर अतिरिक्त सुट्ट्या असणार नाहीत. शिलाँग सर्कलमधील बँका 23 नोव्हेंबरला बंद राहतील. दुसरीकडे 20 आणि 27 नोव्हेंबरला रविवार आणि 26 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

टॅग्स :बँकसंपव्यवसायकर्मचारी