नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता महिन्याच्या पहिल्या तारखेला होणाऱ्या एलपीजीच्या आढाव्यात एलपीजीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आता ग्राहकांना सीएनजी आणि पीएनजीसाठी (CNG-PNG) सुद्धा जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
या वाढीनंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या किमतींच्या आढाव्यात नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. दरम्यान, दर सहा महिन्यांनी सरकार दर ठरवते. दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी हा आढावा घेतला जातो. आता नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती 27 रुपयांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर कच्च्या तेलाच्या ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरीसाठी कराराच्या किमतीत वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हरीचा करार 27 रुपये किंवा 0.4 टक्क्यांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरल झाला. यामध्ये 6,085 लॉटचा व्यवसाय झाला होता. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यावसायिकांद्वारे आपल्या व्यवहाराचा आकार वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या वायदा किमतीत वाढ झाली.