Join us  

नवीन जिंदाल यांची विमान क्षेत्रात उतरण्याची तयारी! दिवाळखोरीतील Go First खरेदीच्या विचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 3:30 PM

मे महिन्यापासून बंद असलेली भारतीय विमान कंपनी गो फर्स्ट खरेदी करण्याच्या शर्यतीत जिंदाल पॉवर लिमिटेड आघाडीवर आहे.

Go First airline: मे महिन्यापासून बंद असलेली भारतीय विमान कंपनी गो फर्स्ट खरेदी करण्याच्या शर्यतीत जिंदाल पॉवर लिमिटेड आघाडीवर आहे. अलीकडेच जिंदाल पॉवरनं एअरलाइन खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केला होता. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट ही बोली प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. याद्वारे कोणत्या कंपन्या किंवा गुंतवणूकदारांना दिवाळखोरीतील कंपनी विकत घ्यायची आहे याची माहिती मिळते."जिंदाल पॉवर हे एकमेव यशस्वी अर्जदार होते ज्यांचं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट बँकांनी स्वीकारलं आहे," असे सरकारी बँकेच्या एका बँकरनं वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितलं. जिंदाल पॉवर लवकरच औपचारिकपणे आपली बोली सादर करू शकेल असंही त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितलं. दरम्यान, यावर गो फर्स्ट आणि जिंदाल पॉवरनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ईओआय सबमिट करण्याची अखेरची तारीख २८ सप्टेंबर होती आणि त्यानंतर कर्जदारांच्या समितीनं अर्जांचं मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतल्याचं एका बँकरनं सांगितलं. दोन इतर परदेशी संस्थांनी देखील गो फर्स्टसाठी बोली लावण्यासाठी ईओआय सबमिट केले असल्याची माहिती आणखी एका बँकरनं दिली.३ मे पासून उड्डाणं बंदवाडिया समूहाच्या मालकीची एअरलाइन गो फर्स्टने ३ मेपासून रोखीच्या तीव्र तुटवड्यामुळे आपली उड्डाणं स्थगित केली आहेत. यासह, एअरलाइननं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) दिल्ली खंडपीठात ऐच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. यालाही मान्यता देण्यात आली असून कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

टॅग्स :व्यवसाय