नवी दिल्ली - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा आज 62 वा वाढिदवस आहे. देशभरातून दिग्गज नेत्यांनी सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दात अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमतीवर त्यांनी भाष्य केलंय.
निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. सीतारामन यांनाआतापर्यंत विरोधकांची बरीच टीका झेलावी लागली आहे. मात्र, आपल्या शांत स्वभावातून आणि कामातूनच त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतरही त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे.
काय म्हणाल्या होत्या अर्थमंत्री
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.